‘एनव्हिडिया’ ही संगणकांचे कामकाज आणखी वेगाने चालावे यासाठी आवश्यक असलेल्या ‘ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (जीपीयू)’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या चिपची निर्मिती करत असलेली कंपनी. तिच्या चिपच्या जोरावरच जगभरात धुमाकूळ घालत असलेला कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अर्थात ‘एआय’चा डोलारा उभा राहू शकला.
‘एआय’च्या मुळाशी असलेल्या चॅट जीपीटी, जेमिनी, क्लॉड, ग्रॉक, डिपसिक अशा ‘लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम)’ची निर्मिती वेगाने होण्यामागे या चिपची उपलब्धता, हे मुख्य कारण होते. ‘एआय’चे आधुनिक रूप या जीपीयू चिपशिवाय उभेच राहू शकले नसते. साहजिकच गेली काही वर्षे ‘एनव्हिडिया’च्या चिपची विक्री अक्षरश: ‘हॉट केक’सारखी झाली आणि कंपनीचे बाजारमूल्य भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) पातळीला जाऊन पोहोचल्याची चर्चा सुरू झाली.
साहजिकच अशा पातळीवर जाऊन पोहोचलेल्या या कंपनीचा घेतलेला प्रत्येक निर्णय दूरगामी ठरू शकतो आणि त्याचे गुंतवणूक क्षेत्रावर व्यापक परिणाम होऊ शकतात. म्हणूनच अलीकडे कंपनीने जाहीर केलेल्या नव्या धोरणाचा थोडक्यात आढावा घेणे क्रमप्राप्त आहे.
Chip Shortage: ‘चिप’मुळे बाजारातही खळबळ!कंपनीचे नवे धोरण
इतके दिवस आपण ‘एलएलएम’ना म्हणजेच चॅट जीपीटी वगैरेंना प्रशिक्षित करण्यासाठीच्या चिपवर भर देत असलो, तरी आता आपण आपले लक्ष यावरून ‘एआय’चे कामकाज चालवू शकत असलेल्या यंत्रणांवर, म्हणजेच उदा. चॅट जीपीटी कार्यरत ठेवण्यासाठीच्या कामांवर देणार असल्याचे कंपनीने जाहीर केले. यासाठी कंपनीला वेगळ्या प्रकारच्या चिप तयार कराव्या लागतील. कारण ‘एलएलएम’ना प्रशिक्षित करण्यासाठीचे काम आणि त्यांच्याकडून प्रत्यक्षात काहीतरी उपयुक्त करून घेण्यासाठीचे काम ही दोन्ही कामे वेगवेगळी असतात. यासाठी चिपची रचना, तिची कार्यक्षमता, तिच्यामधले बारकावे हे भिन्न असते. जणू, प्रशिक्षण संस्था वेगळी आणि कामाचे ठिकाण वेगळे, असा हा प्रकार असतो. आता पहिल्या प्रकारच्या कामांसाठीच्या चिप तयार करण्याऐवजी आपण पुढच्या कामाकडे वळत असल्याचे कंपनीने सूचित केले आहे. यामागे अशा कामाकडे गुगल, ओपनएआय, मेटा, इंटेल या कंपन्यासुद्धा वळत असल्याचे प्रमुख कारण आहे. या स्पर्धेमध्ये आपण मागे पडता कामा नये, अशी ‘एनव्हिडिया’ची रास्त भावना आहे.
भारतावर मोठा परिणाम
कंपनीच्या या धोरणाचा भारतावरही खूप परिणाम होऊ शकतो. कारण आतापर्यंत भारताने ‘एन्व्हीडिया’च्या जुन्या चिप वापरून खर्चात बचत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. आता मात्र, यात बदल करून भारतालाही अशा नव्या चिपकडे वळावे लागेल. अर्थात, त्याचे ‘एआय’च्या अत्याधुनिक प्रकारांना भारतामध्ये चालना देण्याच्या हेतूने सकारात्मक बदलही घडू शकतात. एकूण काय, तर चिपमधली खळबळ ही बाजारातही खळबळ माजवू शकते, हे निश्चित!
लेखक : तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक -विश्लेषक