ढिंग टांग : बाहेर जाण्याचा मार्ग…!
esakal March 23, 2026 09:45 AM

कोस्टल रोड हा आपल्यासाठी बांधण्यात आलेलाच नाही. तो बाहेरच्या लोकांनी इथे यावे आणि इथल्या मराठी माणसाने इथूनच बाहेर जावे, यासाठी बांधण्यात आला आहे, हे षड्यंत्र उघड झाले आणि आमचेही डोळे लख्ख उघडले. कालपर्यंत आम्ही कोस्टल रोड अभिमानाने दाखवत होतो. मुंबापुरीच्या गळ्यातील नवा रत्नहार म्हणून दिमाखाने मिरवत होतो. पण हा दागिना नुसता बेगडाचा नव्हे, तर भाड्याचा निघाला, हे ऐकून दु:ख झाले.

‘‘तुम्ही बसा त्या कोस्टल रोडची स्तुती करत, आणि तोंड काळं करा तिथूनच!’’ साहेबांनी गर्जना केली, तो क्षण साक्षात्कारी होता. ज्या दारातून उपऱ्यांना येता येते, त्याच दाराने स्थानिकांनाही जाता येते, हे कळायला आम्हाला थोडका वेळ लागला.

‘‘साहेब, आमचं चुकलंच, बेसावध राहिलो..,’’ आम्ही पश्चात्तापाने होर्पळत म्हणालो. इतका ढिलेपणा मराठी माणसाला शोभत नाही. पण हे पातक आमच्या हातून घडले खरे.

‘‘आधी तुम्ही त्या इन्स्टा की फिन्स्टामधून बाहेर या,’’ साहेब कडाडले तेव्हा निम्मा-अधिक महाराष्ट्र रिळांमध्ये गळ्यापर्यंत बुडालेला होता. एक बेसावध रीलस्टार (ऊर्फ आम्हीच) म्हणाला, ‘‘अं?’’ त्यालासुद्धा तात्काळ तीनशे लाइक्स आणि दीडशे शेअर मिळाले. अठ्ठावीस लाल बदामही मिळाले. या रीळांमध्ये महाराष्ट्र (ऊर्फ आम्ही) बुडतोय. वेळीच सावध व्हा, असे साहेब पोटतिडकीने सांगत होते, पण कुणी मान वर करील तर शपथ! छे, इथेही चुकलेच. मराठी माणसाने चुका करायच्या तरी किती?

‘‘आपल्याच पक्षाने या रीलस्टार लोकांचा सत्कार केला होता, साहेब! तेव्हापासून आम्ही रील-सुपरस्टार झालो..,’’ आम्ही भीत भीत म्हणालो. रीलस्टार हा मानाचा खिताब आम्हाला ‘मनसे’ मिळाला होता. हा खिताब मिळवण्यासाठी आम्ही शेकडो रिळा बनवण्यात हजारो तास घालवले. आमच्या पक्षाने आमचा सन्मान केला, तेव्हा करिअर घडल्याचे समाधान प्राप्त झाले होते, पण-

‘‘खामोश! अहो, अडकायला होतं त्यात,’’ साहेब गरजले. ‘माझंच दीडेक वर्ष त्यात फुकट गेलं,’ असे बहुधा ते पुटपुटल्याचा आम्हाला भास झाला. आमचे तर अवघे जीवनच फुकट गेल्याचे दु:ख आम्हाला झाले.

ढिंग टांग : मेंबर, रिमेंबर...!

‘‘जाने दो, साहेब! चलता है’’ अत्यंत आगाऊपणाने आम्ही म्हणालो. सोशल मीडियामुळे आमच्यात हा निर्भयपणा आपोआपच आला आहे. तसे एक बक्षीसप्राप्त रीळ आम्ही सोशल मीडियावर करुन टाकले होते. त्याला शेकडो लाइक्स मिळाल्या होत्या.

‘‘पुन्हा खामोश! हिंदीत बोलता? चलता है काय, चलता है...,’’ साहेबांनी मराठीची पताका फडकवली. आम्ही चपापलो. इथेही चुकलोच! काय हे? रिक्षावाल्यापासून रिळवाल्यांपर्यंत सतत हिंदी बोलायचे, आणि वर मराठीचा टेंभा मिरवायचा, हे शोभते का कुणाला? एका रिक्षावाल्याला परवाच आम्ही तडकावला होता. ‘मीटर से नहीं, रिटर्न भाडा नहीं मिलता, सौ रुप्या होएगा’ असे तो रिक्षावाला ऐकवताच आम्ही त्याला सुनावले, ‘‘सौ क्या, दो सौ लेने का, लेकिन मराठी में बोलनेका!’’

‘‘हिंदी में बोलो, असे हिंदीतच सांगता?’’ साहेब आणखीनच भडकले! अरे बापरे, म्हंजे आमचे पुन्हा एकदा चुकले!!

‘‘सॉरी!,’’ आम्ही मराठीत माफी मागितली.

‘‘यापुढे चुका करु नका!’’ साहेब गुरकावले.

‘‘काय करू, साहेब? तुम्ही म्हणाल तसं करतो!’’ आम्ही पडेल आवाजात कबुली दिली.

साहेब संतापातिरेकाने म्हणाले, ‘‘आता तरी लेको आम्हाला मतं द्या ना! किती दिवस आम्ही खळ्ळ खट्याक करत बसणार? कळलं का काही?’’

‘‘ओक्के, डन,’’ आम्ही पुन्हा मराठीत आश्वासन दिले.

साहेब स्वप्नाळूपणाने म्हणाले,‘‘तसं झालं तर कोस्टल रोडनं आम्हाला बाहेर जावं लागणार नाही!’’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.