Nanded Kinwat News किनवट : आजच्या काळात जिथे रक्ताच्या नात्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे, तिथे किनवट (Kinwat) तालुक्यातील वझरा (बु.) येथील एका तरुणाने माणुसकी आणि कौटुंबिक जबाबदारीचा एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. आपल्या दिवंगत भावाच्या मुलांचे भविष्य अंधारात जाऊ नये, यासाठी प्रफुल्ल पाटील या अविवाहित तरुणाने (Unmarried Young Brother) आपल्या वहिनीशी विवाह करून पोरक्या झालेल्या संसाराला खऱ्या अर्थाने सावरले आहे.
Kinwat News :केवळ सहानुभूती न दाखवता प्रफुल्लचा धाडसी अन् कौतुकास्पद निर्णय
वझरा (बु.) येथील रहिवासी अष्टपाल पाटील यांचे फेब्रुवारी 2026 मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. अष्टपाल यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर जणू आभाळच फाटले होते. त्यांच्या पश्चात पत्नी विजयालक्ष्मी, एक 8 वर्षांची मुलगी आणि एक 6 वर्षांचा अंध मुलगा असा परिवार निराधार झाला होता. कर्ता पुरुष गेल्याने मुलांचे शिक्षण, संगोपन आणि पत्नीचा उदरनिर्वाह कसा होणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. कुटुंबाची ही दयनीय अवस्था पाहून धाकटा भाऊ प्रफुल्ल पाटील याने केवळ सहानुभूती न दाखवता एक धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला.
आपल्या वहिनीला (विजयालक्ष्मी) जीवनसाथी म्हणून स्वीकारून, आपल्या पुतण्या आणि पुतणीच्या पितृछत्राची संपूर्ण जबाबदारी प्रफुल्लने स्वतःच्या खांद्यावर घेतली. प्रफुल्ल व्यवसायाने ऑटोरिक्षा चालक आहे. अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थिती असतानाही, स्वतःच्या संसाराचा विचार करण्यापेक्षा त्याने भावाच्या मुलांच्या भविष्याला प्राधान्य दिले. प्रफुल्लच्या या निर्णयाचे ग्रामस्थांसह पंचक्रोशितील नागरिकांकडूनही काैतुक केले जात आहे. या कठीण प्रसंगी घेतलेला निर्णय क्रांतिकारी आणि धाडसी असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहे.
काय म्हणतोय प्रफुल्ल?
"माझ्या भावाच्या पश्चात ही मुले अनाथ होऊ नयेत आणि वहिनीला समाजात सन्मानाने जगता यावे, हाच या विवाहामागचा माझा मुख्य उद्देश आहे. ही माझी केवळ जबाबदारी नसून भावाप्रती असलेले माझे कर्तव्य आहे," अशा भावना प्रफुल्लने यावेळी व्यक्त केल्या. गावकऱ्यांकडून कौतुक वैयक्तिक सुखाचा त्याग करून रक्ताच्या नात्याला आणि माणुसकीला महत्त्व देणाऱ्या प्रफुल्लच्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी काैतुक केले.