एक चिंचोका 1 लाखाला विकायचा, नकली साप, अन् वाघाच्या कातडीने भीती दाखवायचा; अशोक खरात लोकांच्या भावनांशी कसा खेळायचा? धक्कादायक माहिती समोर
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा March 23, 2026 12:13 PM

Ashok Kharat Nashik Crime : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या (Ashok Kharat) लैंगिक अत्याचार प्रकरणात आता आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. धार्मिक विधी, अंधश्रद्धा आणि भीती यांचा आधार घेत खरातने केवळ महिलांचे शोषणच नाही, तर आर्थिक फसवणुकीचेही मोठे जाळे उभे केले होते, अशी माहिती तपासातून उघड होत आहे. (Nashik Crime News)

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बाजारात शंभर रुपये किलोने मिळणारे साधे चिंचोके “दैवी शक्तीचे” असल्याचे सांगत खरात लाखो रुपयांना विकत होता. एका चिंचोक्यासाठी तब्बल एक लाख रुपये उकळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भोळ्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तो पैशांची उकळपट्टी करत होता. याहूनही गंभीर बाब म्हणजे, नकली साप आणि वाघाच्या कातडीचा वापर करून तो लोकांमध्ये दहशत निर्माण करत असे. रिमोटवर चालणारा बनावट नाग हालताना दाखवून “दैवी शक्ती प्रकट झाली” असा आभास निर्माण केला जात होता. तसेच, वाघाचे कातडे दाखवून पूजाविधीसाठी आलेल्या भाविकांची तो फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.

Ashok Kharat Nashik Crime : पूजा करण्याच्या बहाण्याने शोषण

महिलांच्या शोषणाबाबत तर अधिकच संतापजनक माहिती समोर आली आहे. सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेलाही “डिलिव्हरी सुरळीत होण्यासाठी” आणि “उत्तम संततीसाठी” पूजा करण्याच्या बहाण्याने शोषण केल्याचे उघड झाले आहे. “मुलगाच होईल” असे भाकीत करत त्याने महिलेला जाळ्यात ओढले होते. खरातच्या कार्यालयात लावलेल्या कॅमेऱ्यांमधून ही धक्कादायक बाबी समोर आली आहे. सिन्नर येथील इशान्येश्वर मंदिरात भाविकांना नेऊन तांत्रिक विधीच्या नावाखाली फसवणूक केली जात असल्याची माहितीही पुढे आली आहे.

Ashok Kharat Nashik Crime : आजही क्राईम ब्रँचकडून होणार अशोक खरात चौकशी

दरम्यान, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत खरातवर तिसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावरील कारवाईचा फास अधिक आवळला जात आहे. आजही क्राईम ब्रँचकडून त्याची सखोल चौकशी सुरू असून, मंदिरातील पुजारी आणि फार्महाऊसवरील कर्मचाऱ्यांकडूनही पोलिसांनी महत्त्वाची माहिती गोळा केली आहे. तर, अशोक खरात नाग दाखवून काय पूजा करायचा? भाविकांना काय भिती दाखवायचा? याच बाबतीत आज पोलीस माहिती घेणार आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला असून, समाजात संतापाची लाट उसळली आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat Nashik Crime: 'तुझा घटस्फोट विधिलिखित आहे, तू मागील जन्मातील अप्सरा'; अशोक खरातचं घटस्फोटीत महिलेसोबत नको ते कृत्य, भोंदूबाबाचा आणखी एक कारनामा समोर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.