Shiv Thakeray: रिअॅलिटी शोच्या दुनियेत सध्या एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे शिव ठाकरे. बिग बॉस मराठी गाजवल्यानंतर आता शिव ‘The 50’ या गाजलेल्या शोचा विजेता झालाय. शिव ठाकरेने सर्व स्पर्धकांना मागे टाकत ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. दमदार खेळ आणि स्ट्रॅटेजीच्या जोरावर त्याने ही बाजी मारली. विजेतेपदाच्या ट्रॉफीसोबत त्याला 50 लाखांची रक्कमही मिळालेली. पण आता ही रक्कम शिव ठाकरेला मिळणार नाहीय. विजेतेपदासोबत मिळालेली 50 लाखांची प्राईज मनी त्याने स्वतःकडे न ठेवता थेट आपल्या चाहत्याला दिली आहे.
फायनल फेरीत शिव ठाकरेचा मुकाबला मिस्टर फैजू, रजत दलाल, सिंगर काका आणि कृष्णा श्रॉफ यांसारख्या दमदार स्पर्धकांशी होता. मात्र, सर्वांना मागे टाकत शिवने विजय मिळवला. याआधीही त्याने ‘Bigg Boss Marathi 2’ जिंकत आपली क्षमता दाखवली होती. तसेच सलमान खान होस्ट असलेल्या ‘Bigg Boss 16’मध्ये तो फर्स्ट रनर-अप ठरला होता.
‘The 50’ या शोचा फॉरमॅटच वेगळा आहे. विजेत्या स्पर्धकाला मिळणारी रक्कम त्याच्या नोंदणीकृत फॉलोअर्समधून निवडलेल्या ‘नंबर वन फॅन’ला दिली जाते. त्यामुळे शिव ठाकरेने जिंकलेले 50 लाख रुपये सीताराम प्रल्हाद अघाव या त्याच्या चाहत्याला देण्यात आले.
आपल्या विजयाबद्दल बोलताना शिव ठाकरे म्हणाला की, हा शो त्याच्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. “मनापासून खेळत राहूनही आपण जिंकू शकतो, हे मला दाखवायचं होतं. 50 जणांमधून पहिल्या सिझनचा विजेता होणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,” असं तो म्हणाला.
‘The 50’ या शोमध्ये एकूण 50 सेलिब्रिटी सहभागी झाले होते. टीव्ही, सोशल मीडिया आणि म्युझिक इंडस्ट्रीमधील अनेक प्रसिद्ध चेहरे या शोमध्ये दिसले. कठीण टास्क, माइंड गेम्स आणि सतत बदलणाऱ्या समीकरणांमुळे शोमध्ये प्रेक्षकांना भरपूर ड्रामा पाहायला मिळाला. जरी शोला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला, तरी शिव ठाकरेच्या विजयाने या शोला एक वेगळंच हायलाइट मिळालं आहे.