सातारा झेडपी निवडणूक सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Satara Zilla Parishad Election 2026) मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली होती. पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील (Makarand Patil) यांना आपल्या सदस्यांना सभागृहात नेण्यासाठी पोलीस व प्रशासनाशी झुंज द्यावी लागली. या धक्काबुकीत शंभूराज देसाई जखमी झाले, तर मकरंद पाटील यांना 20-25 पोलिसांनी घेरल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून भाजपने आपला अध्यक्ष निवडून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, या अभूतपूर्व गोंधळाची विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेत सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. मात्र, मंत्री जयकुमार गोरे यांनी या निलंबनाच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला. तर या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील राड्याबाबत विधानसभेत सविस्तर माहिती दिली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले.