Anaya Bangar Surgery: माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर (Sanjay Bangar) यांची कन्या अनाया बांगर (Anaya bangar) सध्या बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. तिनं स्वत:च्या आयुष्यात बरेच बदल केले. पुरुषापासून स्त्री झाली. तिनं नुकतंच थायलंड येथे जेंडर अफर्मिंग सर्जरी केली. ही शस्त्रक्रिया तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. सर्जरी झाल्यानंतर अनायाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती शस्त्रक्रियेनंतर तिच्या वडिलांसोबत दिसत आहे. तिनं पोस्ट शेअर करत, 'हा प्रवास केवळ तिच्यासाठीच नव्हे, तर तिच्या संपूर्ण कुटुंबासाठीही सोपा नव्हता', अशी भावना व्यक्त केली. अनायाच्या चाहत्यांनी या पोस्टवर तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
अनायाने म्हटलं की, 'सुरुवातीला परिवाराला माझ्यातील बदल समजून घेणे आणि स्वीकारणे कठीण होते. याविषयी अनेक संभ्रम होते. हळूहळू सर्वांना समजले'. तिने विशेषत: तिच्या वडिलांबद्दल एक खास गोष्ट सांगितली. 'या कठीण काळात वडिलांचा पाठिंबा हीच सर्वात मोठी ताकद ठरली. वडिलांकडून मिळालेला पाठिंबा खूप मोलाचा होता. माझे वडील माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते', असं अनाया आपल्या पोस्टमध्ये म्हणाली. तिनं आपल्या वडिलांसोबतचा फोटो सोशल मीडियात शेअर केला आहे. 'माझ्यासाठी शस्त्रक्रिया ही खूप मोठी गोष्ट होती. पण वडिलांच्या पाठिंब्यामुळे ही गोष्ट मला शक्य वाटली', असं म्हणत अनायाने आपल्या वडिलांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, अनाया बांगरने 2023 साली Hormone Replacement Therapy (HRT) ला सुरुवात केली. जेव्हा शरिरात बदल होत गेले, तेव्हा अनायाने आपल्यात होणाऱ्या बदलांबाबत उघडपणे चर्चा करण्यास सुरुवात केली. खरंतर या काळात तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. मुख्यत: क्रिकेटच्या मैदानात तिला अडचणींचा सामना करावा लागला होता. शारीरिक बदलांमुळे तिच्या खेळात परिणाम झाला होता, अशी माहिती अनाया बांगरने दिली.
View this post on Instagram
एका मुलाखतीत अनायाने, थेरपीच्या या प्रवासात कठीण तसेच त्रासदायक अनुभवांना सामोरे जावे लागले होते, असं सांगितलं. मात्र, इतके होऊनही तिनं हे आव्हान स्वीकारुन स्वत:मध्ये बरेच बदल घडवून आणले. सध्या अनायाची तिच्या आयुष्यातील मोठी शस्त्रक्रिया पार पडली. तिनं पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.