- अश्विनी पवार
पिंपरी - वाढत्या लोकसंख्येमुळे वाढलेली बांधकामे, विकासकामे, वृक्षतोड यामुळे शहराचे हवामान दिवसेंदिवस बिघडत आहे. कधीकाळी राहण्यायोग्य शहर असलेल्या पिंपरी चिंचवडची ओळख राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये होत आहे. ‘जागतिक हवामान दिन’ निमित्ताने शहराच्या पर्यावरणाचा आढावा घेतला असता, गेल्या तीन महिन्यांत फक्त १५ दिवस नागरिकांना शुद्ध हवा मिळाली आहे.
उद्योगनगरी पिंपरी चिंचवडला हिंजवडी आयटी पार्कमुळे शहराला ‘आयटी नगरी’ हे बिरूदही लावले जाते. आयटी कंपन्यांमुळे रोजगाराचे स्वरूप बदलले आणि लोकसंख्या वाढल्याने झपाट्याने शहरीकरण झाले. मात्र, त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे शहरातील हवेची ढासळलेली गुणवत्ता आणि त्यासाठी जबाबदार असलेले वाढते प्रदूषण.
उत्तम हवेचे ‘दिवस’ कमी
शहरातील हवेची खालावणारी गुणवत्ता हा सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. खराब रस्ते, विकासकामांसाठी होणारे खोदकाम, इमारतींची बांधकामे, वाढलेली वाहने आणि पर्यावरण सुधारण्यासाठी उपायोजनांची कमतरता यामुळे दरवर्षी शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. यावर्षी जानेवारी ते आजपर्यंतच्या कालावधीमध्ये तब्बल ६६ दिवस हवा मध्यम प्रदूषित असल्याचे आकडेवारी सांगते.
म्हणजेच साधारण तीन महिन्यांतील ८१ दिवसांपैकी केवळ १५ दिवस पिंपरी चिंचवडकरांना शुद्ध हवा मिळाली आहे. वैद्यकीय तज्ज्ज्ञांच्या मते, ‘‘मध्यम प्रदूषित हवेत जास्त काळ राहिल्यास श्वसनास अडथळा येणे, अस्थमा व हृदयरोग यासारख्या समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो.’
तापमानही वाढले
पुण्याचे जुळे शहर असलेल्या पिंपरी चिंचवडमधील हवामान आल्हाददायक असायचे. मात्र, आता मार्चमध्येच तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंशांवर जाऊन पोहचत आहे. सिमेंटची जंगले, काँक्रीटचे रस्ते आणि कमी होत चाललेली झाडे यामुळे हवामानात समतोल ढासळून वसाळ्याच्या स्वरुपात बदल झाला असून, कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या वर्षी मे व जूनमध्ये हिंजवडी भागात केवळ अर्धा तास पडलेल्या पावसाने उडवलेली दाणादाण हे याचेच एक उदाहरण म्हणता येईल.
महिना आणि शुद्ध हवेचे दिवस
ऑक्टोबर २०२५ - १९
नोव्हेंबर - ९
डिसेंबर - ०
जानेवारी २०२६ - ६
फेब्रुवारी - ३
२२ मार्चपर्यंत - ६
(माहिती स्रोत : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ)
खराब हवेमुळे जे आरोग्याला त्रास होतात. तेच त्रास मध्यम प्रदूषित हवेत जास्त काळ राहिल्याने होतात. त्यामुळे सध्या जो हवा गुणवत्ता निर्देशांत आहे, तो आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. एकूणच गेल्या काही महिन्यांत जर शहरातील हवेची गुणवत्ता पाहिली, तर चांगल्या आणि श्वास घेण्यायोग्य हवेचे दिवस कमी होत आहेत का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
- श्वेता वेर्णेकर, ‘परिसर’ संस्था