काँग्रेसच्या तुलनेत एक लिटर पेट्रोलवर मोदी सरकार किती टॅक्स लावते? खासदाराने आकडेवारीच मांडली
एबीपी माझा ब्युरो March 25, 2026 01:43 AM

नवी दिल्ली : लोकसभेत अर्थ विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पेट्रोल आणि डिझेलवरील कराच्या मुद्द्यावरून त्यांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. हुड्डा यांनी सांगितले की, काँग्रेसच्या काळात पेट्रोलवर प्रतिलिटर सुमारे 9 रुपये एक्साइज ड्युटी आकारली जात होती, तर डिझेलवर सुमारे 3.5 रुपये कर होता. तर सध्या मोदी सरकारच्या काळात पेट्रोलवर प्रतिलिटर सुमारे 23 रुपये आणि डिझेलवर 21 रुपये एक्साइज ड्युटी आकारली जात आहे. या वाढलेल्या करांवरून काँग्रेसने सरकारला धारेवर धरल्याचं दिसून आलं. 

Farmers Loan : शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा

काँग्रेसचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही सरकारला लक्ष्य केलं. देशातील शेतकऱ्यांवर सुमारे 32 लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याचं ते म्हणाले. त्यावर सरकारकडे कर्जमाफीसाठी कोणतीही योजना नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्याउलट, कॉर्पोरेट्सचे सुमारे 16 लाख कोटी रुपये माफ केल्याचा दावा हुड्डा यांनी केला.

Political Attack : ‘सिलेंडर संकट’ की ‘सरेंडर संकट’? 

सरकारवर निशाणा साधताना हुड्डा म्हणाले की, देशात केवळ ‘सिलेंडर संकट’ नाही, तर ‘सरेंडर संकट’ देखील आहे. भारताचे अनेक आर्थिक निर्णय बाह्य दबावाखाली घेतले जात असल्याचे दिसते.

Rupee Fall : रुपयाच्या घसरणीवर सवाल

भारतीय रुपयाच्या घसरणीवरही दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी प्रश्न उपस्थित केला. इराण आणि लेबनानसारख्या युद्धग्रस्त देशांच्या चलनासोबत रुपयाची तुलना केली. रुपयाची इतकी घसरण व्हायला भारतावर कोणता बॉम्ब पडला आहे? असा सवाल त्यांनी केला. तसेच, देशातील संपत्तीतील विषमतेकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, देशातील 1% लोकांकडे 40% संपत्ती आहे, तर 50% लोकांकडे केवळ 3% संपत्ती आहे. 

ही बातमी वाचा: 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.