Yavatmal Crime: भरदिवसा तरुणाचा खून; किरकोळ वाद कारणीभूत, नेर शहरात खळबळ
esakal March 25, 2026 02:45 PM

नेर (जि. यवतमाळ) : किरकोळ कारणावरून झालेल्या वादात गावातीलच काही मुलांनी पान सेंटरचे संचालक शाहेबाज खान तसदीक खान पठाण (वय ३७) यांचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. सलग पाच ते सहा वार केल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.

त्यांना रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. नेर शहरातील नबाबपूर येथील इलीगंट इंग्लिश शाळेजवळ मंगळवारी (ता. २४) दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली.

Nagpur Crime: दारूच्या वादातून मित्राचा खून; नागपुरात तीन जणांना अटक

प्राप्त माहितीनुसार, सकाळी दहाच्या सुमारास शाहेबाज यांचे त्यांच्या घराजवळील काही मुलांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. मात्र, सकाळच्या वादाचा विषय तिथेच मिटला होता. परंतु, दुपारच्या सुमारास जेव्हा शाहेबाज खान आपले पान सेंटर बंद करून घराकडे जात होते, तेव्हा सकाळी झालेल्या त्याच किरकोळ भांडणावरून मारेकऱ्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. बेसावध असलेले शाहेबाज रक्तबंबाळ अवस्थेत पडले.

स्थानिकांनी आणि त्यांच्या भावाने तातडीने ग्रामीण रुग्णालयात त्यांना हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. या क्रूर खुनामुळे पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत शाहेबाज यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई-वडील आणि तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. या घटनेने परिसरातील शांतता भंग पावली असून, नागरिकांच्या मनात सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Akola Crime: आकाेल्यात टकमक पाहण्याच्या वादातून युवकाचा खून; डाबकी रोडवरील घटना, तिघे आरोपी सहा तासांत जेरबंद!

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि नेर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. दवाखान्यात आप्तेष्टांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून आरोपींना अटक केली. मोहम्मद साहिल मोहम्मद इसराईल (वय २१), फैजान खा जमील खा ऊर्फ सोनू (वय २४) व उजेफ खा एजाज खा (वय १९) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास नेर पोलिस करीत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.