सुनील जगताप
उरुळी कांचन : उरुळी कांचन गावातील दैनंदिन वाहतूक व्यवस्था पूर्ण बेशिस्त झाली असून त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने गावातील सर्वसामान्य जनता व पंचक्रोशीतून येणारे नागरिक,व्यापारी,महिला,विद्यार्थी प्रचंड त्रस्त झाले असुन वाहतुकीची कोंडी, रस्त्यात होणारे अस्तव्यस्त अवैध पार्किंग सेवा रस्त्यावरील व गावातील अंतर्गत रस्त्यांवरील टपऱ्यांचे,हातगाड्यांचे,भाजी,फळ विक्रेते यांचे अतिक्रमण तसेच ओढ्यावरील व सार्वजनिक जागांवरील विनापरवानगी वाढणारे बांधकाम,अतिक्रमण ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून नजरेआड होत आहे.नेमकी अर्थपूर्ण तडजोडीतून कारवाई केली जात नाही का ? कारवाई करण्याची हिम्मत होत नाही असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
उरुळी कांचनच्या भौतिक गरजांसाठी नियोजनबद्ध रस्ते विकास करण्यासाठी जनतेने निवडून दिलेल्या सरपंच,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य,आमदार,खासदार यांनी एकत्र येवून सर्वांगीण विकास आराखडा तयार करून जनतेला दिलासा देण्याचे काम करणे अपेक्षित असताना ते गेल्या अनेक वर्षाच्या काळात होत नाही ही पण एक शोकांतिका आहे असे सजग नागरिक मंचाचे पदाधिकारी सांगत आहेत.
जी गोष्ठ अंतर्गत रस्त्यांची तीच गत पुणे - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाची ! या गावातून पुणे - सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो ज्याने गावाचे दोन भागात विभाजन केले आहे,तसेच मुंबई - पुणे या ठिकाणाहून दौंड,सोलापूर,हैदराबादच्या बाजूला जाणाऱ्या रेल्वे गाड्या उरुळी स्टेशनवरून जातात या लोहमार्गानेही गावाच्या हद्दीचे विभाजन झाले आहे,अशा दोन महत्वाच्या दळणवळण मार्गाच्या गावठाण हद्दीतून जाण्याने गावाचे तीन तुकडे झाले आहेत यावरून होणारी मोठ्या वाहनांची वाहतूक व वाढलेल्या नागरीकरणाने असलेल्या कामगार, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी वर्ग यांच्या दुचाकी,चारचाकी वाहने,ट्रॅक्टर आदीची दररोजची वाढणारी संख्या यामुळे असलेले रस्ते हा वाहतुकीचा भार पेलण्यासाठी अकार्यक्षम ठरत असताना यावरील अतिक्रमण काढणे,होवू न देणे हाच योग्य मार्ग असताना ग्रामपंचायत प्रशासन मुग गिळून गप्प बसण्यात धन्यता मानत आहे याचा अर्थ घोडे पेंढ खात आहे अशी खंत जेष्ठ नागरिक बोलून दाखवीत आहेत.
गावातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास ग्रामपंचायत प्रशासनाने सहकार्य मागितल्यास पोलीस प्रशासन ते देण्यास तयार आहे मात्र पुढाकार ग्रामपंचायतीने घेणे गरजेचे आहे.
सचिन वांगडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन पोलीस स्टेशन.