मुंबईत हवंय 85 जणांना इच्छामरण, गंभीर आजार नसूनही… अजब प्रकारामुळे प्रशासनही पेचात!
Tv9 Marathi March 26, 2026 02:45 AM

देशात हरीश राणा यांच्या इच्छामरणाच्या प्रकरणानंतर मुंबईतही इच्छामरणासाठी अर्ज होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबई महापालिकेकडे आतापर्यंत एकूण 85 जणांनी इच्छामरणासाठी अर्ज सादर केले आहेत. मात्र, या अर्जांबाबत सुस्पष्ट धोरण आणि प्रक्रियेचा अभाव असल्याने पुढील कार्यवाहीबाबत प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व अर्ज लिव्हिंग विल स्वरूपातील आहेत. संबंधित व्यक्तींनी सध्या पूर्णपणे सुस्थितीत असताना, कोणत्याही गंभीर आजाराशिवाय हे विल तयार केले आहेत. या विलद्वारे त्यांनी भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाली की मृत्यू अटळ असेल आणि आयुष्य किती काळ शिल्लक आहे हे निश्चित सांगता येत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार थांबवण्याची परवानगी दिली आहे.

महापालिकेकडे इच्छामरणासाठी अर्ज

महापालिकेने विविध प्रभागांतील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे इच्छामरणा संदर्भातील अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, या प्रक्रियेबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अर्जांची पुढील निर्णय प्रक्रिया अद्याप रखडलेली आहे. इच्छामरणाबाबत वाढती अर्जांची संख्या लक्षात घेता, यासंदर्भात स्पष्ट धोरण आणि अंमलबजावणीची गरज अधोरेखित होत आहे. अशा अर्जांची डिजिटल नोंद करण्यासाठी सरकारच्या शहरी विकास विभागाने पोर्टल तयार केले आहे, मात्र अद्याप महापालिका स्तरावर त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

हरीश राणा यांचे निधन

भारतात निष्क्रिय इच्छामृत्यू (पॅसिव यूथनेशिया) मिळवणारे पहिले व्यक्ती हरीश राणा यांचे मंगळवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) येथे निधन झाले. ते 2013 पासून कोमामध्ये होते आणि मागील 13 वर्षांपासून लाइफ सपोर्ट सिस्टीमवर अवलंबून होते. हरीश राणा हे पंजाब विद्यापीठातील बीटेकचे विद्यार्थी होते. 2013 मध्ये चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर ते सतत कोमामध्ये होते. या काळात त्यांना कृत्रिम पोषण (न्यूट्रिशनल सपोर्ट) आणि अधूनमधून ऑक्सिजन सपोर्ट दिला जात होता.

31 वर्षीय हरीश राणा यांना 14 मार्च रोजी गाझियाबाद येथील त्यांच्या घरातून दिल्लीतील डॉ. बी.आर. आंबेडकर इन्स्टिट्यूट रोटरी कॅन्सर हॉस्पिटलच्या पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले होते. याच्या तीन दिवस आधी, 11 मार्च रोजी, सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात त्यांना निष्क्रिय इच्छामृत्यूची परवानगी दिली होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या पोषण सहाय्याला हळूहळू कमी करण्यात आले. त्यानंतर लाइफ सपोर्ट सिस्टीम ठराविक वेळेनंतर काढून टाकण्यात आली. त्यानंतर काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.