Karad Accident: डंपरच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू; कऱ्हाड-विटा मार्गावरील घटना, काॅलेज सुटल अन् घरी निघाल्या, नेमकं काय घडलं!
esakal March 26, 2026 11:45 AM

कऱ्हाड: डंपरने दुचाकीला धडक दिल्याने प्राध्यापिकेचा जागीच मृत्यू झाला. कऱ्हाड-विटा मार्गावरील जनता बझारनजीक आज सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. सुषमा आनंदा कीर्तने (वय ५४, रा. गजानन हाउसिंग सोसायटी, कऱ्हाड) असे या मृत्यू झालेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ चे काम पूर्ण; 'या' दिवशी होणार खुला, प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी वाचणार!

कीर्तने या विद्यानगर (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये वनस्पतिशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका होत्या. महाविद्यालय सुटल्यानंतर त्या बसस्थानकाकडे दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्या वेळी कृष्णा नाक्याकडून विजय दिवस चौकाकडे दगड घेऊन डंपर निघाला होता. याच डंपरने कीर्तने यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

डंपरने दुचाकीसह कीर्तने यांना दहा ते बारा फूट अक्षरशः फरफटत नेल्याने कीर्तने गंभीर जखमी झाल्या होत्या. जखमी कीर्तने यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर कऱ्हाड - विटा मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती. अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या डंपरसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या नावासह अन्य माहिती घेण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू होती.

Equestrian Statue: बीबीदारफळमध्ये मध्यरात्रीच उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; हटविण्यास ग्रामस्थांचा विरोध पोलिस ठाण्यात तणाव

अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. संबंधित डंपर पोलिस ठाण्यात आणताना वाटेत त्यातील दगड उतरविण्यात आले. त्याची माहिती मिळताच नागरिकांनी थेट पोलिस ठाणे गाठून पोलिसांना त्याचा जाब विचारला. त्यामुळे तेथे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.