Dr. Jaysingrao Pawar Passes Away: छत्रपतींचा इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
esakal March 26, 2026 11:45 AM

कोल्हापूर - महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील दिग्गज आणि मराठेशाहीच्या अभ्यासाचे प्रमुख विद्वान डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने ते कोल्हापूरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या निधनाने इतिहास प्रेमी आणि संशोधकांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म ३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर गावात झाला. त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून एम.ए. पदवी प्रथम श्रेणीत मिळवली आणि त्यानंतर पीएच.डी. संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन स्तरावर प्राध्यापक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एम.ए. स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वीसपेक्षा अधिक अभ्यासक्रम पुस्तके लिहिली. १९६४ मध्ये शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संशोधनाची सुरुवात झाली. विद्यापीठाच्या इतिहास विभागात ऐतिहासिक कागदपत्रांच्या अभ्यासातून त्यांनी आपली संशोधन कारकिर्द घडवली.

Kolhapur Amababi Temple : पायाला बसणार नाहीत आता चटके; मंदिर परिसर, दर्शन रांग मार्गावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू

त्यांच्या लेखन आणि संशोधनाने मराठा इतिहासाला नवी दिशा मिळाली. महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ असे पंचवीसपेक्षा अधिक महत्त्वाचे ग्रंथ त्यांनी लिहिले. शिवाय महाराष्ट्राच्या इतिहासावर, राजर्षी शाहू यांच्या चरित्रावर आणि कोल्हापूरच्या पंचखंडात्मक इतिहासावर त्यांनी संपादन कार्य केले. निरनिराळ्या इतिहास परिषदांमध्ये आणि संशोधन नियतकालिकांत त्यांचे ४५ हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक-सदस्य होते आणि तीन वर्षे अध्यक्षपद भूषविले. १९९२ मध्ये त्यांनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी ही संस्था स्थापन केली आणि संस्थापक-संचालक म्हणून दीर्घकाळ कार्य केले. या संस्थेतर्फे २००१ मध्ये १२०० पानांचा तीन खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ प्रकाशित झाला. हा ग्रंथ १६ भारतीय भाषांबरोबरच रशियन, फ्रेंच, इटालियन आणि जपानी भाषांत अनुवादित होण्याच्या प्रक्रियेत आहे. कन्नड, कोकणी, इंग्रजी, जर्मन, उर्दू, तेलुगू आणि हिंदी भाषांत तो आधीच प्रकाशित झाला आहे.

डॉ. पवार यांनी राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य या ग्रंथाचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती प्रकाशित केल्या. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या ग्रंथांचे प्रकाशन झाले. इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शाहू चरित्र (इंग्रजी) या ग्रंथाचे प्रकाशन झाले आणि पुण्यात त्यांना ‘शाहू चरित्रकार’ म्हणून गौरवण्यात आले. त्यांच्या २५ हून अधिक ग्रंथांना विविध संस्थांकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाले आहेत. इतिहास संशोधन आणि सामाजिक प्रबोधनासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठातील डॉ. जयसिंगराव शाहू संशोधन केंद्राचे संचालक म्हणूनही त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या डॉ. पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अमूल्य इतिहासकार गमावला आहे.

Kolhapur Circuit Bench : पोलिसांनी आरोपीला 24 तासांहून अधिक काळ कोठडीत ठेवणे पडले महागात; कोल्हापूर सर्किट बेंचचे सुटकेचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.