साप, मर्सिडीज कार अन् परदेशात अनेक ठिकाणी…; भोंदू बाबा अशोक खरातच्या फसवणुकीचा नवा पॅटर्न समोर
Tv9 Marathi March 26, 2026 11:45 AM

आध्यात्मिक शक्तीचा आणि देवाचा धाक दाखवून सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातविरुद्ध नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर नाशिकमध्ये नरबळी आणि इतर अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१८ पासून सुरू असलेल्या या लुटीच्या प्रवासात तक्रारदाराने आपली कोट्यवधींची मालमत्ता गमावल्याचे समोर आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदाराने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, अशोक खरातने २०१८ मध्ये तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. त्यानंतर २०२५ पर्यंत त्याने सातत्याने तक्रारदाराला मानसिक आणि आर्थिक विळख्यात ओढले. तुमच्यावर मोठे संकट आहे, तुमचे संपूर्ण कुटुंब संपून जाईल अशी भीती घालून त्याने तक्रारदाराला आपल्या शब्दांत अडकवले. ही भीती घालवण्यासाठी त्याने वेळोवेळी अघोरी प्रथांचा वापर केला.

खरातने तक्रारदाराला सांगितले की, जर तुम्हाला आयुष्यात भरभराट हवी असेल आणि कुटुंबावरील संकट टाळायचे असेल, तर जगातील २१ देशांमध्ये जावे लागेल. तिथल्या मातीला स्पर्श केल्याशिवाय तुमचे ग्रहदोष दूर होणार नाहीत. या अंधश्रद्धेपोटी तक्रारदाराने खरातचे अनेक परदेश दौरे आयोजित केले. या सर्व दौऱ्यांचा विमान प्रवास, राहणे-खाणे आणि विलासी खर्च तक्रारदाराकडूनच उकळण्यात आला. इतकेच नव्हे तर, परदेशात स्वतःवर करण्यात आलेल्या महागड्या हाय-फाय वैद्यकीय उपचारांचे बिलही त्याने तक्रारदाराला भरायला लावले.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ईशानेश्वर मंदिरात घडलेला प्रकार. खरातने उत्तर पूजा करण्याच्या बहाण्याने तक्रारदाराला मंदिरात नेले. पूजा सुरू असताना त्याने अघोरी विधी केले आणि अचानक ईशानेश्वर महाराज आले आहेत असे ओरडत तक्रारदारासमोर एक जिवंत मोठा साप आणला. या प्रकारामुळे तक्रारदार प्रचंड हादरले आणि त्यांनी भीतीपोटी खरात सांगेल त्या सर्व मागण्या मान्य केल्या.

खरातच्या विलासी जीवनशैलीचा भारही तक्रारदारावरच होता. त्याने स्वतःसाठी एक आलिशान मर्सिडीज कार तक्रारदाराकडून खरेदी करून घेतली. तसेच, स्वतःच्या मालकीच्या फार्महाऊसच्या बांधकामापासून ते देखभालीपर्यंतचा संपूर्ण खर्च तक्रारदाराकडून वसूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांकडून तक्रारीची गंभीर दखल

नाशिक पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, खरात विरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह फसवणूक आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. अशा भोंदू बाबांच्या नादाला लागून नागरिकांनी आपली आर्थिक आणि मानसिक फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान अशोक खरातविरुद्ध यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, आता नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यातील कलमे लावण्यात आल्याने त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणात आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.