इतिहास संशोधक आणि लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांचं आज निधन झाले.
गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांना वेगळ्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, आज, 26 मार्च रोजी सकाळी त्यांचं कार्डियॅक अरेस्टमुळे निधन झाले.
डॉ. जयसिंगराव पवार यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.ए आणि पीएच.डी पदवी संपादन केल्यावर तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयांमध्ये त्यांनी अध्यापन केले. त्यांनी महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी अनेक पुस्तकं लिहिली.
तडसर ते कोल्हापूरडॉ. जयसिंगराव पवार यांच्यावर ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी लेखन केलं आहे. डॉ. चोरमारे यांनी डॉ. जयसिंगराव पवारांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रवास थोडक्यात मांडला आहे :
'सांगली जिल्ह्यातील तडसर हे डॉ. पवार यांचे मूळ गाव. शेतकरी कुटुंबातला जन्म. त्यामुळे वडिलोपार्जित शेती करावी असे विचार त्यांच्या मनात यायचे. शेतीतच काही वेगळे प्रयोग करण्याचा ते गंभीरपणे विचार करीत होते. अर्थात त्यांनी ते केले असते तरी तिथेही काही नवे निर्माण केले असते. परंतु त्याहून महत्त्वाचे काम त्यांच्या हातून व्हायचे होते. कोरडवाहू शेती असल्यामुळे विहीर खोदण्याची इच्छा होती, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या वडिलांना ते शक्य झाले नाही.
शालेय शिक्षण संपल्यानंतर काही घटनांमुळे सगळ्या दिशाच बदलून गेल्या. त्यांची शेती एका श्रीमंत व्यक्तीने विकत घेतली. दहावी झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी कराडला जाण्याचा विचार करू लागले. त्यासंदर्भात ते मित्रांसोबत गप्पा मारत बसले असताना त्यांचे एक शिक्षक तिथे आले. त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये जाण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी ते कराडऐवजी राजाराम कॉलेजमध्ये आले. साल होते 1958.
राजाराम कॉलेजमध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांच्या घडण्याला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. सगळ्या मित्रांनी घेतला म्हणून त्यांनीही बी.ए.ला अर्थशास्त्र विषय घेतला, पण त्याची काही गोडी लागेना. ते इतिहासातच रमले.
एम.ए. ला शिवाजी विद्यापीठात पहिले आले आणि तेव्हापासूनच संशोधक म्हणून कारकीर्दीची सुरूवात झाली. 1965 साली त्यांचा इतिहासावरचा पहिला लेख प्रसिद्ध झाला. तीच इतिहास संशोधक म्हणून त्यांच्या कारकीर्दीची नांदी ठरली.'
डॉ. विजय चोरमारे म्हणतात, "इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असे नाही. डॉ. पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच ते वर्तमानातील राजकीय, सामाजिक घटना-घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचे लेखन ते करीत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करीत असतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करीत असतात."
डॉ. जयसिंगराव पवारांच्या निधनानं 'वर्तमानाशी धागा जोडणारा इतिहासकार हरपला'
25 हून अधिक इतिहासविषयक ग्रंथांचं लेखनशिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगराव यांच्या संशोधन कारकिर्दीला 1964 मध्ये सुरुवात झाली. या विद्यापीठातील इतिहास विभागात त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनाचा अनुभव घेतला. त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ इत्यादी एकूण 25 पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले.
मेहता पब्लिशिंग हाऊसने त्यांच्या या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, निरनिराळ्या इतिहास परिषदांमध्ये तसेच संशोधनपर नियतकालिकांत त्यांचे 45हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक - सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते.
त्यांनी 1992 मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. इतिहास संशोधन व त्याद्वारा समाजप्रबोधन हे त्यांचे उद्दिष्ट असून, त्यानुसार संस्थेतर्फे 1200 पानांचा, तीन खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ 2001मध्ये प्रसिद्ध केला होता.
भारतातील 16 भाषांमध्ये तसेच रशियन, फ्रेंच, इटालियन, जपानी या परकीय भाषांमध्ये अनुवादाचे काम सुरू होते.
डॉ. जयसिंगराव शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या संस्थेचे संचालक आहेत. महाराष्ट्राचा इतिहास, राजर्षी शाहू चरित्र व कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास इत्यादी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले होते.
महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य या मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.
इतिहास संशोधन क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच, माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते शाहू चरित्र (इंग्लिश) या ग्रंथाचे प्रकाशन करून शाहूचरित्रकार म्हणून पुणे येथे त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
डॉ. पवार यांनी ऐतिहासिक, तसेच इतर अनेक विषयांवरील 25 पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले. त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध संस्थांकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला. त्यांना इतिहासविषयक संशोधनातील आणि सामाजिक कार्याबद्दल अनेक व्यक्ती व संस्थांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
इतिहास संशोधनावरील त्यांचे निवडक ग्रंथ :त्यांची महाराणी ताराबाई, क्रांतिसिंह नाना पाटील, सेनापती संताजी घोरपडे, संभाजी स्मारक ग्रंथ, मराठेशाहीचा मागोवा, मराठी साम्राज्याचा उदयास्त, शिवचरित्र – एक मागोवा, शिवचरित्रापासून काय शिकावे?, आमच्या इतिहासाचा शोध व बोध, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ (3 खंड), मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध, मराठेशाहीचे अंतरंग, शिवपुत्र छत्रपती राजाराम, छत्रपती संभाजी – एक चिकित्सा, राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व कार्य, राजर्षी शाहू छत्रपती: एक मागोवा, राजर्षी शाहू छत्रपतींचे जाहीरनामे व हुकूमनामे, राजर्षी शाहू छत्रपती, कर्मवीर भाऊराव पाटील व प्रबोधनकार ठाकरे, राजर्षी शाहू छत्रपतींची भाषणे, राजर्षी शाहू छत्रपती पत्रव्यवहार आणि कायदे, मराठ्यांचा इतिहास खंड 1 : शिवशाही, मराठ्यांचा इतिहास खंड 2 : पेशवाई, मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई : खंड 1 व 2. ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)