Uddhav Thackeray Vidhan Parishad Election: राज्यसभेनंतर आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा होत आहे. राज्यसभेची हक्काची जागा सोडल्याने उद्धव सेनेत खडाजंगी झाल्याची चर्चा रंगत असतानाच आता विधान परिषदेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा संधी देण्यासाठी फिल्डिंग लावण्यात येत आहे. 13 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत. निवडणूक लवकरच होईल, पण त्यापूर्वीच सत्तेच्या सारीपाटावर गणितं मांडण्यात आली आहे. तर डावपेचही आखले जात आहेत. काय सुरू आहे राजकीय घडामोड?
समारोपाच्या कार्यक्रमात एकमेकांना चिमटे
उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आमदारांना विधान परिषदेतून निरोप देण्यात आला. त्यासाठी आयोजित समारोप कार्यक्रम चांगलाच रंगला. राज्यसभेत सदस्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिला होत्या. राज्यातील विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच केले. पण खरं लक्षं वेधलं ते उद्धव ठाकरे यांच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जुगलबंदीने. उद्धव ठाकरे यांनी शेरोशायरीतून विधानसभेतील वातावरण हलकंपुलकं करण्याचा प्रयत्न केला. तर त्याचवेळी निशाणा साधत चिमटेही काढले. अर्थात हा निशाणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णय घेण्याच्या कृतीचे कौतुक केले. बाळासाहेब ठाकरे यांचा हा वारसा त्यांनी पुढे नेल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेचे तिकीट?
विधान परिषदेतील 9 सदस्य आता एका महिन्यानंतर निवृत्त होतील. या 9 पैकी 8 जागांवर सत्ताधारी महायुतीचा विजय पक्का आहे. विरोधी पक्षांच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या पारड्यात एक मताचं वजन पडेल. अर्थात महायुतीने जर नऊही जागांवर दावा सांगितला तर मग एका जागेसाठी चुरस निर्माण होईल. क्रॉस वोटिंगची भीती सु्द्धा आहे.
राज्यसभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक होती. तर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची बाजू उचलून धरली. त्यांनी राज्यसभेवरील हक्क सोडला. काँग्रेसचे मन वळवण्यात राष्ट्रवादीला यश आले आणि महाविकास आघाडीच्या खात्यातील एका जागेवर शरद पवार हे राज्यसभेवर निवडून गेले. आता विधान परिषदेसाठी हाच फॉर्म्युला विधान परिषदेसाठी वापरावा अशी उद्धव गटाची मागणी आहे. यापूर्वी शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवावे आणि विधान परिषदेची जागा शिवसेनाला सोडावी अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली होती.
कुणाचे पारडे जड?
अर्थात महाविकास आघाडीत काँग्रेसचे 16 आमदार तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 10 आमदार आहेत. तर सर्वाधिक 20 आमदार हे उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. त्यामुळे राज्यसभा जशी हातातून गेली. तसे काँग्रेसच्या हातात विधान परिषदेतही काही खास लागण्याची शक्यता कमीच आहे. 29 आमदारांच्या मतांवर विधान परिषदेचा रस्ता मोकळा होतो. राष्ट्रवादी काँग्रेस आता राज्यसभेच्या बदल्यात उद्धव सेनेला पाठिंबा देईल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेतील एंट्री पक्की मानली जात आहे.
तर काँग्रेसचे 16 आणि उद्धव ठाकरे यांचे अतिरिक्त एक मत अशी 17 मतांची मोट महाविकास आघाडीकडे आहे. जर महाविकास आघाडीने गेम पालटवला आणि 10 मतं खेचून आणली तर मात्र महाविकास आघाडीचे दोन आमदार निवडून येतील. अर्थात ही शक्यता अत्यंत धूसर मानली जाते. उलट एकनाथ शिंदे यांचा एखादा आमदार अधिकचा निवडल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पडद्याआड मोठ्या घडामोडी घडत आहेत.