गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोलीच्या शासकीय नर्सिंग कॉलेजच्या 45 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थिनींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. अन्न, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत येणाऱ्या शासकीय नर्सिंग कॉलेजच्या 45 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. त्यांना उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे. गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात शासकीय नर्सिंग कॉलेज आहे. येथे एकूण 185 विद्यार्थिंनी निवासी राहून नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. या सर्व विद्यार्थिनींना कॉलेजच्या कॅन्टीन मधून जेवण आणि नाश्ता दिला जातो. काल रात्री विद्यार्थिनी जेवण करुन झोपी गेल्या. यानंतर पहाटे दोन तीन विद्यार्थिनींना पोटदुखी त्रास व उलट्या होऊ लागल्याने त्यांना त्वरित उपचारार्थ मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी सकाळी नर्सिंग कॉलेजच्या 45 विद्यार्थिंनींना नेमका असाच त्रास होवू लागला. त्यामुळे या सर्व विद्यार्थिंनींना तातडीने मेडिकल कॉलेज मध्ये दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. सध्या या सर्व विद्यार्थिनींची परिस्थिती धोक्यावर असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कुसुमाकर घोरपडे यांनी एबीपी माझाला दिली आहे.