Weather Update: पुढील 48 तास धोक्याचे! हवामान विभागाचा मोठा इशारा, अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट
Tv9 Marathi March 26, 2026 11:45 PM

30 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. 31 मार्च रोजीदेखील राज्याच्या काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत असा सल्ला देण्यात आला आहे. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

मोहोळ तालुक्यात अवकाळी पाऊस

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात काल रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. या वादळी पावसामुळे सोलर पॅनल ३० ते ४० फूट उंच उचकटून फेकले गेले, तर शेतकऱ्यांच्या गुलाबाच्या शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले. शेतकरी म्हणाले की, “वर्षभरात गुलाबाच्या शेतीतून आम्हाला १० ते १२ लाख रुपये उत्पन्न मिळते, पण कालच्या पावसाने या हंगामातील संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले आहे.” सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

चिपळूणमध्येही अचानक पावसाची हजेरी

दरम्यान, चिपळूणमध्येही अचानक पावसाने हजेरी लावली असून, पाऊस सध्या सुरू आहे. हा पाऊस आंबा उत्पादनासाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. वातावरणात प्रचंड मोठे बदल होत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.