अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांत इराणचे नेते मारले गेले, आता ट्रम्प यांच्याशी चर्चा कोण करणार?
BBC Marathi March 27, 2026 01:45 AM
Getty Images

'इस्रायली सैन्याला आता कोणत्याही वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याला लक्ष्य करण्याची मोकळीक दिली आहे. त्यासाठी वेगळी परवानगी घेण्याची गरज नाही', असं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी म्हटलं आहे.

हे वक्तव्य या काळात आले आहे जेव्हा इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF ) इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी आणि गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब यांना मारले. IDF ने गेल्या काही आठवड्यांत इराणच्या अनेक प्रमुख नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना मारले आहे.

इराणचा कोणताही मोठा अधिकारी दिसला आणि त्याच्यावर कारवाईची तयारी झाली असेल तर लगेच हल्ला करा, पुन्हा परवानगी घेण्याची गरज नाही, असं पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि मी (इस्रायल कॅट्झ) दोघांनी आयडीएफला अधिकृत केलं आहे, असं इस्रायलचे मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी सांगितलं.

पण हे नेते इराणमध्ये किती महत्त्वाचे होते? आणि आता सत्ता कोणाकडे आहे? इराणचं नेतृत्व वेळोवेळी कसं बदलत गेलं ते सोप्या पद्धतीने समजून घेऊया.

अयातुल्ला अली खामेनी - सर्वोच्च नेते (मृत)

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या झाली, ही गोष्ट अनेकांसाठी धक्कादायक होती. कारण 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केलेला तो पहिलाच दिवस होता.

86 वर्षांचे खामेनी हे 30 वर्षांहून अधिक काळापासून इराणवर राज्य करत होते. ते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्यानंतर सत्तेत आले. खोमेनी यांनी 1979 मध्ये इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणची स्थापना केली होती.

IRANIAN LEADER PRESS OFFICE / HANDOUT via Getty अयातुल्ला अली खामेनी यांनी तीन दशकांहून अधिक काळ इराणवर राज्य केले.

खामेनी यांनी सर्व शक्तिशाली पदांचे नेतृत्व केले होते. ते देशाचे सर्वात मोठे नेते होते आणि संपूर्ण सैन्याचे प्रमुखही होते. यामध्ये ताकदवान रिव्होल्युशनरी गार्ड्सचाही समावेश होता.

खामेनी पूर्ण हुकूमशहा नव्हते, पण त्यांच्याकडे खूप मोठी सत्ता होती. ते सरकारच्या कोणत्याही निर्णयाला थांबवू शकत होते म्हणजेच त्यांच्याकडे 'व्हेटो पॉवर' होती. निवडणुकीसाठी कोण उभं राहील हेही ते ठरवू शकत होते.

ते देशातील वेगवेगळ्या सत्ताकेंद्रांमध्ये स्वतःला मध्यभागी ठेवत. कधी कधी राजकारणापेक्षा वर असल्यासारखे वागत असत- इराणच्या सुधारणावादी आणि पुराणमतवादी यांच्यातील भांडणाकडे दुर्लक्ष करत.

परंतु, खामेनी फार कमी वेळा विरोध वाढू देत असत. ज्या गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या, त्या पुढे जाऊच देत नसत किंवा लगेच थांबवत असत.

मोज्तबा खामेनी - आता इराणचे सर्वोच्च नेते (जिवंत)

8 मार्च 2026 रोजी वडिलांच्या जागी सर्वोच्च नेता म्हणून मोज्तबा खामेनी यांच्या नावाची घोषणा झाली. तेव्हापासून ते अजूनही सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. ना त्यांचा व्हीडिओ आला, ना फोटो समोर आला.

इराणचे नवे सर्वोच्च नेते हल्ल्यात जखमी झाले आहेत आणि त्यांचा चेहराही बिघडला असण्याची शक्यता आहे, असा दावा अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी केला होता. त्यांच्या दाव्यावर त्यांनी कोणतेही पुरावे सादर केले नव्हते.

हे हल्ले 28 फेब्रुवारीला तेहरानमध्ये झाले होते. यात त्यांचे आई-वडील आणि भावाचा मृत्यू झाला होता.

NurPhoto via Getty Images मोज्तबा खामेनी

12 मार्च रोजी, सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर टेलिव्हिजनवर त्यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला.

पहिल्याच संदेशात त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवली जाईल, ज्यामुळे जगातील सुमारे 20 टक्के तेलाचा पुरवठा रोखला जाऊ शकतो. त्याचबरोबर युद्धात मारल्या गेलेल्या लोकांच्या 'रक्ताचा बदला घेतल्याशिवाय' ते शांत बसणार नाहीत, असा इशारा दिला.

20 मार्चला, पर्शियन नववर्ष नवरोजसाठी सरकारी टीव्हीवर त्यांचा आणखी एक लिखित संदेश वाचून दाखवण्यात आला. हे त्यांच्या वडिलांपेक्षा वेगळं होतं, कारण त्यांच्या वडिलांनी नेहमी कॅमेऱ्यासमोर येऊन थेट लोकांशी संवाद साधला होता.

अली लारीजानी - राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख (मृत)

17 मार्च 2026 रोजी तेहरानमधील पार्डीस भागात अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात 68 वर्षीय अली लारीजानी मारले गेले. या हल्ल्यात त्यांचा मुलगा आणि एक जवळचा सहकारीही (डेप्युटी) मरण पावला.

खामेनीनंतर इतक्या मोठ्या पदावरचा नेता मारला जाण्याची ही सर्वात मोठी घटना होती.

अली लारीजानी पूर्वी रिव्होल्युशनरी गार्ड्समध्ये कमांडर होते. नंतर ते इराणच्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंगचे प्रमुख झाले आणि जवळपास 10 वर्षे ते त्या पदावर होते. यानंतर 2004 मध्ये त्यांना खामेनी यांचे सुरक्षा सल्लागार म्हणून नेमण्यात आलं.

COURTNEY BONNEAU/Middle East Images/AFP via Getty Images अली लारीजानी

लारीजानी हे 2005 ते 2007 दरम्यान इराणकडून पश्चिम देशांशी अणू चर्चेचे प्रमुख होते. परंतु, त्यांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेझाद यांच्याशी मतभेद झाले आणि त्यामुळे त्यांना त्या पदावरून हटवण्यात आलं होतं.

यानंतर ते इराणच्या संसदेच्या अध्यक्षपदी (स्पीकर) होते आणि तब्बल 12 वर्षे त्या पदावर राहिले. इतका दीर्घ काळ हे पद सांभाळणारे ते एकमेव नेते ठरले.

लारीजानी हे खामेनींचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत (सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल) काम करत होते. असं मानलं जातं की, 2025 च्या शेवटी आणि 2026 च्या सुरुवातीला इराणमध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनांवर अभूतपूर्व कारवाई करण्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.

या कारवाईत सुरक्षा दल आणि बसीज निमलष्करी दलाने आंदोलन दडपलं. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मते, या काळात 6 हजार 508 आंदोलक मारले गेले आणि 53 हजार लोकांना अटक करण्यात आली होती.

रिअर ॲडमिरल अली शामखानी - इराणच्या संरक्षण परिषदचे सचिव (मृत)

अली शामखानी हे खामेनींचे जवळचे सल्लागार होते आणि इराणच्या सुरक्षा व अणू धोरणांमध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. ते इराणचे एकमेव रिअर ॲडमिरल (नौदलातील वरिष्ठ अधिकारी) होते. 28 फेब्रुवारी रोजी तेहरानवर झालेल्या अमेरिका-इस्रायल हल्ल्यात ते मारले गेले.

जून 2025 मध्ये इस्रायल-इराण युद्धाच्या वेळी त्यांच्या घरावर हल्ला झाला होता. त्या वेळी ते जखमी झाले होते. या हल्ल्यातून ते बचावले होते.

Anadolu via Getty Images रिअर ॲडमिरल अली शामखानी

1980 च्या दशकात इराण-इराक युद्धावेळी अली शामखानी हे रिव्होल्युशनरी गार्ड्समधील महत्त्वाचे कमांडर होते.

गेल्या 4 दशकांत शामखानी यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. ज्यात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी), संरक्षण मंत्री, नौदलाचे कमांडर आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव- आणि अलीकडच्या काळात त्यांनी आंदोलनं दडपण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मेजर जनरल मोहम्मद पाकपोर - आयआरजीसीचे कमांडर इन चीफ (मृत)

इराणच्या सरकारी माध्यमानुसार, 28 फेब्रुवारी रोजी तेहरानवर झालेल्या हल्ल्यात मेजर जनरल मोहम्मद पाकपोरही मारले गेले.

Morteza Nikoubazl/NurPhoto via Getty Images मेजर जनरल मोहम्मद पाकपूर

मोहम्मद पाकपोर हे 16 वर्षे आयआरजीसीच्या ग्राउंड फोर्सचे प्रमुख होते. त्यांच्या आधीचे प्रमुख हुसेन सलामी युद्धात मारले गेल्यानंतर, त्यांना कमांडर-इन-चीफ म्हणून बढती देण्यात आली.

मसूद पेझेश्कियान - इराणचे राष्ट्राध्यक्ष (जिवंत)

सुधारणावादी विचारांचे मसूद पेझेश्कियान 6 जुलै 2024 रोजी इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. परंतु, निवडणुकीत उभं राहण्यासाठी आधी गार्डियन कौन्सिल नावाच्या 12 धर्मगुरू आणि कायदेतज्ज्ञांच्या समितीची परवानगी घ्यावी लागते, ती प्रक्रिया त्यांनी पार केली होती.

71 वर्षीय पेझेश्कियान हे पूर्वाश्रमीचे हृदय शल्यचिकित्सक आणि संसद सदस्यही होते. ते इराणच्या 'मोरॅलिटी पोलिसां'वर टीका करत होते आणि महिलांना त्रास होऊ नये असं त्यांनी म्हटलं होतं.

IRANIAN PRESIDENCY / HANDOUT via Getty इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान

तसंच, त्यांनी देशात 'एकता आणि एकसंधता' आणण्याचं आणि इराणचं जगापासून झालेलं 'दूरत्व' (आयसोलेशन) कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं.

'प्रदेशातील शांततेसाठी इराण कटिबद्ध' आहे, असं त्यांनी 11 मार्च रोजी एक्सवर म्हटलं होतं.

पाच दिवसांनंतर त्यांनी जगातील इतर देशांकडे मदत मागितली. ते म्हणाले की, "आम्ही अपेक्षा करतो की, जागतिक समुदायाने अमेरिका आणि इस्रायलच्या कारवाईचा निषेध करावा आणि त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करायला भाग पाडावं."

मोहम्मद बाघेर गालिबाफ - इराणच्या संसदेचे अध्यक्ष (जिवंत)

मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी आता रिव्होल्युशनरी गार्डचा गणवेश सोडून साधे कपडे घातले असले, तरी त्यांचा कडक आणि अधिकारशाही स्वभाव अजूनही तसाच आहे. ते सरकारच्या समर्थनात ठामपणे बोलत आले आहेत.

ते प्रशिक्षित पायलट आहेत. त्यांना खूप महत्त्वाकांक्षी नेता म्हणून ओळखलं जातं आणि त्यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाची चार वेळा निवडणूक लढवली आहे.

Morteza Nikoubazl/NurPhoto via Getty Images इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ

64 वर्षीय गालिबाफ सध्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत.

इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले झाल्यानंतर त्यांनी एक्सवर लिहिलं की, "जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि आता संघर्ष अधिक तीव्र झाला आहे."

"अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, ज्यामुळे आर्थिक आणि तेल बाजारावर परिणाम होतो. अमेरिका-इस्रायल आता अडचणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत," असं गालिबाफ यांनी 24 मार्च रोजी एक्सवर म्हटलं होतं.

"हल्ला करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी असं, इराणी लोकांना वाटतं. आणि हे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत सर्व इराणी नेते आपले सर्वोच्च नेते आणि जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील," असंही त्यांनी पुढे लिहिलं.

ब्रिगेडियर जनरल घोलामरेझा सुलेमानी - बसीज दलाचे कमांडर (मृत)

इराणच्या सरकारी माध्यमानुसार, 17 मार्च रोजी अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात बसीजचे प्रमुख घोलामरेझा सुलेमानी मारले गेले.

ब्रिगेडियर अहमद-रेझा रदान - पोलीस प्रमुख (जिवंत)

पोलीस प्रमुख अहमद रेझा रदान यांच्यावर कडक सामाजिक नियम लागू करण्याची आणि विरोध दडपण्याची जबाबदारी आहे.

2023 मध्ये त्यांनी 'नूर प्लॅन' सुरू केला. या योजनेत कॅमेरे आणि स्मार्ट तंत्रज्ञान वापरून हिजाबचे नियम न पाळणाऱ्या महिलांना ओळखून त्यांच्यावर कारवाई केली जाते. यामध्ये गाड्या जप्त करणे आणि दुकानं बंद करणे अशा शिक्षा दिल्या जातात.

Morteza Nikoubazl/NurPhoto via Getty Images ब्रिगेडियर अहमद-रेझा रदान

अलीकडे, रदान यांनी सरकारविरोधी आंदोलनांवर कठोर भूमिका घेतली आहे. युद्धाच्या सुरुवातीस त्यांनी सांगितलं होतं की, जर कोणताही नागरिक युद्धाच्या काळात 'शत्रूच्या सांगण्यावरून' विरोधात बाहेर आला, तर तो 'शत्रू' समजला जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल.

घोलामहोसेन मोहसेनी इजेई - इराणचे सरन्यायाधीश (जिवंत)

जानेवारीमध्ये, इराणचे सरन्यायाधीश घोलामहोसेन मोहसेनी इजई यांनी नागरिकांना इशारा दिला होता. आंदोलनांमध्ये हिंसाचार करणाऱ्यांना 'कोणतीही माफी' किंवा त्यांच्याप्रती 'सौम्यपणा दाखवला जाणार नाही', असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

ब्रिगेडियर जनरल इस्कंदर मोमेनी - गृहमंत्री (जिवंत)

इस्कंदर मोमेनी हे इराणचे गृहमंत्री असून ते ऑगस्ट 2024 पासून या पदावर आहेत. आयआरजीसी आणि पोलीस कमांड या दोन्ही संस्थांमध्ये त्यांचं चांगलं नेटवर्क आहे.

ब्रिगेडियर जनरल इस्माइल कानी - आयआरजीसी कुद्स फोर्सचे कमांडर (जिवंत)

इराणच्या माध्यमांमध्ये त्यांना 'लेव्हंटचे जनरल' म्हणून ओळखले जात. ब्रिगेडियर जनरल इस्माइल कानी हे 2020 मध्ये आयआरजीसी कुद्स फोर्सचे कमांडर झाले.

Fatemeh Bahrami/Anadolu via Getty Images ब्रिगेडियर जनरल इस्माइल कानी

2012 मध्ये, अमेरिका सरकारच्या ट्रेझरी विभागाने इस्माइल कानींवर बंदी घातली होती. कारण त्यांनी मध्य पूर्व आणि आफ्रिकेमध्ये, विशेषतः गॅम्बियामध्ये, कुद्स फोर्ससाठी आर्थिक मदत आणि शस्त्र पुरवठ्याचे काम पाहिले होते.

इस्माइल खतीब - गुप्तचर मंत्री (मृत)

इस्माईल खतीब यांची 2021 मध्ये दिवंगत माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी इराणचे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली होती.

त्यांनी अली खामेनी यांच्यासह अनेक उच्चपदस्थ मौलवींच्या हाताखाली इस्लामिक न्यायशास्त्राचा (धर्म आणि कायद्याचा अभ्यास) अभ्यास केला होता.

ABEDIN via EPA इस्माइल खतीब

त्यानंतर त्यांनी इराणच्या गुप्तचर विभागात विविध वरिष्ठ पदं हाताळली आणि सर्वोच्च नेत्यांच्या कार्यालयातही महत्त्वाचं पद भूषवलं होतं.

गुप्तचर मंत्री इस्माइल खतीब यांची इस्रायली हवाई हल्ल्यात 'निष्ठूरपणे हत्या' करण्यात आली. या घटनेमुळे इराणला मोठा 'धक्का' बसला आहे, असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलं होतं.

मेजर जनरल अब्दोलरहीम मौसावी - इराणच्या सशस्त्र दलाचे प्रमुख (मृत)

28 फेब्रुवारीच्या इस्रायल‑अमेरिका हवाई हल्ल्यात, इराणच्या सशस्त्र दलांचे चीफ ऑफ जनरल स्टाफ मेजर जनरल अब्दोलरहीम मौसावी यांचाही मृत्यू झाला.

Anadolu via Getty Images मेजर जनरल अब्दोलरहीम मौसावी

त्यांनी आपल्या आधीचे प्रमुख मोहम्मद बाघरी यांची जागा घेतली होती. बाघरी यांचा 12 दिवसांच्या युद्धात मृत्यू झाल्यानंतर 12 जूनपासून ते हे पद सांभाळत होते.

सदेघ लारीजानी - एक्सपेडिअन्सी डिस्कर्नमेंट कौन्सिलचे अध्यक्ष (जिवंत)

अली लारीजानींचे भाऊ सदेघ लारीजानी हे एक्सपेडिअन्सी कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. ही संस्था इराणच्या संसद आणि संविधानाच्या रक्षणासाठी असलेल्या गार्डियन कौन्सिल यांच्यातील अंतिम निर्णय घेणारी संस्था किंवा लवाद आहे.

अब्बास अराघची - परराष्ट्र मंत्री (जिवंत)

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि अमेरिकेच्या मध्यपूर्वेचे विशेष दूत स्टीव्ह व्हिटकॉफ यांच्यात काही फोन कॉल्स झाल्याचे वृत्त आहे. पण ही चर्चा अतिशय प्रारंभिक टप्प्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

Karim JAAFAR / AFP via Getty Images अब्बास अराघची

इराणने कधीही अमेरिका आणि इस्रायलसोबत होणाऱ्या युद्धात 'युद्धविराम मागितलेला नाही', असं 15 मार्च 2026 रोजी इराणचे अब्बास अराघची यांनी सीबीएस न्यूजला सांगितलं होतं.

त्यांनी म्हटलं होतं की, "हे युद्ध अध्यक्ष ट्रम्प आणि अमेरिकेने निवडलेलं आहे, आणि आम्ही आमच्या स्वसंरक्षणासाठी लढत राहू."

ब्रिगेडियर जनरल अझीझ नासिरझादेह - संरक्षण मंत्री (मृत)

संरक्षणमंत्री ब्रिगेडियर जनरल अझीझ नासिरझादेह यांचाही 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

इराणच्या नेत्यांना लक्ष्य करून काय साध्य झालं?

अमेरिका आणि इस्रायलची योजना इराणच्या सरकारला 'गोंधळात टाकणे आणि संभ्रमित करण्याची होती', असं युद्धाच्या सुरुवातीस, अमेरिकेचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी म्हटलं होतं.

युद्धाच्या सुरुवातीस, अमेरिका आणि इस्रायल दोघांनाही इराणमधील सरकार बदलायचं होतं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर व्हीडिओमध्ये इराणच्या नागरिकांना, 'तुमचं सरकार स्वतःच्या ताब्यात घ्या,' असं आवाहन केलं होतं.

हीच भावना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 19 मार्च रोजी व्यक्त केली होती. त्यांनी इराणच्या नागरिकांना 'संधीचं सोनं करा' असं म्हटलं होतं.

इराणमध्ये हौतात्म्याला (मृत्यू) धार्मिक आणि राजकीय महत्त्व आहे. या वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू म्हणजे सत्तेचा शेवट नाही तर सरकार अजूनही सुरू आहे असा संदेश देण्यासाठी वापरला जात आहे.

उदा. इराणच्या सरकारी टीव्हीवर, एका वृत्तनिवदेकाने अश्रू ढाळत अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूची बातमी दिली. त्याने त्यांच्या मृत्यूची तुलना हौतात्म्याशी करून त्याला स्वर्गाशी जोडलं.

आणि दोन आठवड्यानंतर, अली लारीजानींचा मृत्यू जाहीर करताना, सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलने (एसएनएसी) म्हटलं की, "पवित्र आत्म्यांनी अल्लाहचे सेवक, शहीद डॉ. अली लारीजानी यांचा आत्मा स्वीकारला. त्यांनी आयुष्यभर इराण आणि इस्लामिक क्रांतीसाठी लढा दिला, अखेरीस त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आणि त्यांना हौतात्म्य मिळालं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

  • दुबई, सौदी अरेबिया ते बहरीन... इराण युद्धामुळे आखातात काम करणाऱ्या भारतीयांचं काय होईल?
  • युद्ध जर असंच चालू राहिलं, तर ते संपवणं इराण आणि अमेरिकेसाठीही अवघड जाईल का?
  • 'अंतिम मुदतीचा इशारा, गोल्फ आणि एल्विस प्रिस्लेच्या घराला भेट' ; युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचे कोणते प्रयत्न सुरू आहेत?
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.