LPG Crisis : मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात गॅस तुटवड्याच्या अफवा पसरत आहेत. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किंमती, पुरवठा आणि तुटवड्याबद्दल चर्चा सुरु आहेत. दरम्यान, सरकारने आज (27 मार्च, 2026) तेल आणि गॅस पुरवठा व तुटवड्याबाबत एक मोठे निवेदन जारी केले. सरकारने म्हटले आहे की, देशात तेलाचा तुटवडा नाही आणि पुढील दोन महिन्यांसाठी लागेल एवढा पुरवठा सुरळीत आहे.
देशात एलपीजीचा तुटवडा नाही. व्यावसायिक एलपीजी पुरवठा 70 टक्क्यांनी पूर्ववत झाला आहे. आतापर्यंत व्यावसायिक ग्राहकांना 30000 टन वितरित करण्यात आले आहेत. आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे. याव्यतिरिक्त, 30000 पाच-किलोग्रॅमचे सिलिंडरही पुरवण्यात आले आहेत.आमच्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे, तसेच एलपीजी आणि पीएनजी उपलब्ध आहेत, अशी माहितीही सरकारकडून देण्यात आली आहे. पेट्रोल पंपांवरील रांगांमागे अफवा हेच कारण आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याच्या अफवा असल्यामुळं नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करताना दिसत आहे.
गेल्या 24 तासांत, आखाती प्रदेशातील सर्व भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. गेल्या दोन दिवसांपासून, एलपीजीनंतर पेट्रोल आणि डिझेलबाबत घबराट पसरवली जात आहे आणि अफवा पसरवल्या जात आहेत, तर सत्य हे आहे की पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही.
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, लॉकडाऊनची गरज नाही. लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, किंवा अशा कोणत्याही योजनेवर विचारही करण्यात आलेला नाही. देशात 1 लाख पेट्रोल पंप आहेत, त्यापैकी 91000 सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (PSUs) मालकीचे आहेत. देशात तेलाचा पुरेसा साठा आहे. कुठेही तुटवडा नाही. सरकारकडे दोन महिन्यांचा पुरवठा उपलब्ध आहे. आमच्याकडे पुरेसे इंधनही उपलब्ध आहे.
मध्यपूर्वेतील सुरु असलेल्या युद्ध आणि संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे, असे सरकारने म्हटले आहे. याच काळात सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्कात कपात करण्याची घोषणाही केली आहे. तसेच, दर 15 दिवसांनी किमतींवर लक्ष ठेवण्यासाठी एक यंत्रणा सुरू केली जाईल, असेही सरकारने म्हटले आहे.