पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
जयदीप भगत, बारामती March 27, 2026 07:43 PM

पुणे : कर्नाटकातील कलबुर्गी (Kalaburagi) जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी एक थरारक घटना उघडकीस आली आहे. बारामती येथील अक्षय आणि शैला हे दाम्पत्य देवदर्शनासाठी गाणगापूरला गेले असताना त्यांच्यात किरकोळ वादाचा प्रकार घडला. त्यानंतर संतापाच्या भरात अक्षयने पत्नी शैलावर केलेल्या अमानुष अत्याचारामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका किरकोळ कारणावरून रस्त्यात झालेल्या वादानंतर अक्षयने पत्नी शैलाला कारमधून ओढून बाहेर काढत तिच्यावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Karnataka Crime Case : धारदार शस्त्राने गळा चिरला

पत्नीचा राग आल्यानंतर पतीने तिला कारमधून बाहेर ओढत मारहाण केली. तिला लाथा-बुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीनंतरही आरोपीचा संताप शांत झाला नाही. त्याने धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरला. इतकंच नाही, तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीवरून कार चालवत तिला चिरडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अमानुष कृत्यात शैलाचा जागीच मृत्यू झाला.

Kalaburagi Murder Viral Video : लोक बघत राहिले, मदतीला कुणी नाही

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, महिला मदतीसाठी तडफडत असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी मदतीसाठी पुढे न येता व्हिडीओ शूट करण्यावर भर दिला. अनेक गाड्या त्या ठिकाणाहून जात होत्या. तर घटनेच्या ठिकाणी अनेक लोक उपस्थित होते. असं असतानाही कुणीही तिच्या मदतीला धावून आले नाही, ही बाब समाजमनाला अस्वस्थ करणारी आहे.

Karnataka Police Action : आरोपी पती अटकेत

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी अक्षयला अटक केली आहे. ही हत्या पूर्वनियोजित होती का याचा तपास सुरू असून पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.