अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
परशराम पाटील, एबीपी माझा March 27, 2026 08:13 PM

Balen Shah: बलेंद्र (बालेन) शाह (Balen Shah) यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. वयाच्या 35 व्या वर्षी, बालेन हे देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. खासदार म्हणून शपथ घेण्याच्या काही तास आधी, त्यांनी एका रॅप गाण्याच्या माध्यमातून आपला पहिला संदेश दिला, ज्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार, व्यवस्थेतील बदल आणि तरुणाई या विषयांवर भाष्य केले. आपल्या गाण्यात त्यांनी म्हटले आहे की, एकता हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे आणि यावेळी इतिहास घडत आहे. बालेन यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (आरएसपी) 5 मार्च रोजी झालेल्या निवडणुका जिंकल्या. कार्यवाहक पंतप्रधान सुशीला कार्की यांनी म्हटले आहे की, देशाचे भविष्य आता तरुणांच्या हातात आहे आणि नवीन सरकार भ्रष्टाचार संपवेल अशी अपेक्षा आहे.

सुधन गुरुंग यांची गृहमंत्री म्हणून नियुक्ती 

मंत्रिमंडळ स्थापनेची प्रक्रियाही सुरू झाली आहे. सुधन गुरुंग यांची गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यावर अंतर्गत सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असेल. शिशिर खनाल यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते नेपाळचे राजनैतिक धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध सांभाळतील.

बालेन मधेसीतून पहिले पंतप्रधान  

बालेन यापूर्वी काठमांडूचे महापौर होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षात प्रवेश केला. बालेन हे मधेस प्रदेशातील पहिले पंतप्रधान ठरले आहेत. मधेस प्रदेश हा नेपाळचा एक भाग आहे जो देशाच्या दक्षिण भागात भारताच्या सीमेला लागून पसरलेला आहे. तो तराई प्रदेश म्हणूनही ओळखला जातो. येथे राहणाऱ्या लोकांना मधेसी म्हणून ओळखले जाते. नेपाळी राजकारणात प्रतिनिधित्व आणि अस्मितेवरून हा प्रदेश बऱ्याच काळापासून चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे आणि राजकीय संतुलनाच्या दृष्टिकोनातून बालेन यांची पंतप्रधान म्हणून निवड महत्त्वपूर्ण मानली जाते.

बालेन शाह यांच्या पक्षाचा दोन-तृतीयांश बहुमताने विजय

नेपाळमध्ये सामान्यतः आघाडी सरकारे स्थापन केली जातात, जिथे दोन किंवा अधिक पक्ष मिळून बहुमत तयार करतात. नेपाळमधील मागील निवडणुकांमध्ये, नेपाळी काँग्रेस आणि नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (संयुक्त मार्क्सवादी-लेनिनवादी) यांच्यात मुख्य लढत होती. मात्र, यावेळी परिस्थिती बदलली. रवी लामिछाने यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (आरएसपी) स्वबळावर बहुमत मिळवले. 2022 मध्ये चौथा सर्वात मोठा पक्ष बनलेल्या आरएसपीने यावेळी 275 पैकी 182 जागा जिंकल्या.

रॅप बॅटल जिंकल्यानंतर बालेन प्रसिद्धीझोतात

नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांची कहाणी पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळी आहे. 1990 मध्ये काठमांडूच्या नारदेवी परिसरात जन्मलेले बालेन हे त्यांच्या आई-वडिलांचे सर्वात लहान पुत्र आहेत. त्यांचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, तर त्यांची आई कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असे. बालेन विवाहित असून पत्नी आणि मुलीसोबत राहतात. त्यांनी काठमांडूमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली आणि नंतर कर्नाटकात विश्वेश्वरैया उच्च शिक्षण घेतले. 2013 मध्ये नेपाळमधील एक लोकप्रिय रॅप बॅटल जिंकल्यानंतर त्यांना ओळख मिळाली. त्यांच्या गाण्यांमधून व्यवस्थेकडून परकेपणा आणि दुर्लक्ष अनुभवणाऱ्या तरुण पिढीचा राग व्यक्त होत होता.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.