Maharashtra Rain News : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं डोकं वर काढलं आहे. या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. आज धाराशिव जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामध्ये फळबागांसह कांदा, गहू, कलिंगड या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
धाराशिवमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. लोहारा, धाराशिव, तुळजापूर परिसरामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी पिकासह फळबागांना फटका बसला आहे. पंधरवाड्यात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यापूर्वी गारपिटीमुळे द्राक्ष, आंबा आणि कलिंगड बागायतदार शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अहिल्यानगर शहरात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. काही दिवसांपूर्वीच अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील पारनेर, शेवगाव, पाथर्डी आणि श्रीगोंदा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आज पुन्हा जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील गहू, कांदा, कलिंगड सह शेतातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोहोळ तालुक्यातील येवती-पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नकसानीची पाहणी शिवसेनेच्या खासदार ज्योतीताई वाघमारे यांनी केली आहे. सरकार आणि लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहेत, असा शब्द देत त्यांनी हतबल झालेल्या बळीराजाला धीर दिला आहे. द्राक्ष बागा, केळी, आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना खासदारांसमोर अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
बारामती शहरात आज अचानक वातावरणात मोठा बदल झाला असून, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर उकाडा जाणवत असताना सायंकाळच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. बारामती आणि परिसरात अचानक आलेल्या या बदलामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहताना दिसले, तर काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.