आयपीएलच्या 19 व्या मोसमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या हंगामात एकूण 10 संघात साखळी फेरीत 70 तर प्लेऑफमध्ये 4 असे एकूण 74 सामने होणार आहेत. या हंगामातील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. मात्र त्याआधी इमपॅक्ट प्लेअर या नियमाची चर्चा पाहायला मिळत आहे. इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत नाराजीचा आणि विरोधाचा सूर पाहायला मिळत आहे. या नियमाला खेळाडूंपासून कर्णधारांनी उघड उघड विरोध दर्शवला आहे. या निमित्ताने हा नियम नक्की काय आहे? निवडक कर्णधारांची भूमिका काय आहे? तसेच बीसीसीआयचं काय म्हणणं आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
दिल्ली कॅपिट्ल्सचा कर्णधार आणि ऑलराउंडर अक्षर पटेल याने काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत इम्पॅक्ट प्लेअर नियमबाबत जाहीर भूमिका घेत विरोध दर्शवला. या नियमामुळे ऑलराउंडरला सर्वाधिक फटका बसल्याचं अक्षरने नमूद केलं.
“टीमकडून आधी बॅटिंग आणि बॉलिंगने दुहेरी योगदान देणाऱ्या खेळाडूला प्राधान्य दिलं जायचं. मात्र आता टीम मॅनेजमेंट गरजेनुसार आणि परिस्थिती पाहून फलंदाज आणि गोलंदाजांना संधी देत आहे. त्यामुळे ऑलराउंडरला फटका बसत आहे”, असं अक्षरने म्हटलं आणि या नियमाला आपला विरोध का आहे हे सांगितलं.
“तसेच या नियमबाबत आपल्या हातात काहीच नाही. त्यामुळे खेळाडूंना नाईलाजाने या नियमाचं पालन करावं लागत आहे”, अशी खंतही अक्षरने बोलून दाखवली.
इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे क्रिकेटच्या मुळ संतुलनाला धक्का लागत असल्याचं गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल याने स्पष्ट केलं.
“क्रिकेट 11 खेळाडूंचा खेळ आहे. त्यात आणखी 1 अधिकचा खेळाडू जोडल्याने सामना एकतर्फी होऊ शकतो. इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे टीमची बाजू काही प्रमाणात भक्कम होते. त्यामुळे खेळातील आव्हान कमी होतं”, असं शुबमनने नमूद केलं.
“अनुकूल खेळपट्टीवर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याऐवजी अवघड स्थितीत लक्ष्य प्राप्त करण्यात खरं आव्हान आहे”, असं गुजरात टायटन्सच्या कर्णधाराने म्हटलं.
अक्षर पटेल, शुबमन गिल आणि रोहित शर्मा, विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी नियमाबाबत आपली भूमिका मांडली. मात्र त्यानंतरही बीसीसीआय याबाबत वर्षभर तरी काही बदल करणार नसल्याचं स्पष्ट आहे.
मुंबईत 19 व्या मोसमाआधी सर्व 10 संघांचे कर्णधार एकत्र आले. तेव्हा बीसीसीआयच्या मुख्यालयात या नियमबाबत सविस्तर चर्चा झाली. बहुतांश कर्णधारांनी या नियमाविरोधात भूमिका मांडली. इतकंच नाही तर बीसीसीआयने या नियमाबाबत फेरविचार करावा, अशी मागणीही कर्णधारांकडून करण्यात आली.
कर्णधारांच्या तीव्र विरोधानंतरही या नियमात 2027 पर्यंत कोणताही बदल शक्य नसल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे खेळाडूंना 19 व्या मोसमात तरी या नियमासोबतच खेळावं लागणार हे स्पष्ट आहे.
इम्पॅक्ट प्लेअर निर्णयाची 2027 पर्यंत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याआधी या नियमात बदलाची शक्यता नसल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
क्रिकेट चाहत्यांना इम्पॅक्ट प्लेअर काय आहे? त्याची अंमबलबजावणी कशी केली जाते? याबाबत माहिती आहे. मात्र ज्यांना याबाबत माहित नाही त्यांच्यासाठी आपण या नियमाबाबत सोप्या भाषेत जाणून घेऊयात.
इम्पॅक्ट प्लेअर नियमाची 2023 पासून अंमलबजावणी करण्यात आली. नियमानुसार, दोन्ही संघांच्या खेळाडूंना मॅच रेफरी/पंचांकडे आपल्या प्लेइंग ईलेव्हनमधील 11 खेळाडूंसह 4 सब्स्टीट्यूट असलेल्या क्रिकेटपटूंची नावं द्यावी लागतात. त्यानंतर सामन्यादरम्यान कर्णधार 4 पैकी कोणत्याही एका खेळाडूची इम्पॅक्ट प्लेअर म्हणून निवड करतो. मात्र इम्पॅक्ट खेळाडूची निवड केल्यानंतर प्लेइंग ईलेव्हनमधून एका खेळाडूला बाहेर व्हावं लागतं. त्यामुळे उर्वरित सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर खेळतो.
दोन्ही संघांच्या कर्णधारांना इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करताना ऑन फिल्ड अंपायरला माहिती द्यावी लागते. एखाद्या संघाने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गोलंदाजाला संधी दिल्यास तो खेळाडू प्लेइंग ईलेव्हनमधील क्रिकेटरप्रमाणे 4 ओव्हर बॉलिंग करु शकतो.
आता इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा फायदा काय? याबाबत जाणून घेऊयात. संबंधित संघ बॅटिंग किंवा बॉलिंग करताना गरजेनुसार या नियमाची अंमलबजावणी करतात. कधीकधी बॅटिंग करताना एखाद्या संघाची निराशाजनक सुरुवात होते. अवघ्या काही धावांत संघांचे खेळाडू स्वस्तात बाद होऊन मैदानाबाहेर जातात. त्यामुळे टीम अडचणीत सापडलेली असते. अशात संबंधित टीम प्लेइंग ईलेव्हनमधील एकाला हटवून त्याच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून बॅटिंगमध्ये माहिर असलेल्या फलंदाजाचा समावेश करते. त्यामुळे संबंधित फलंदाज मोठी खेळी करुन संघाला सन्मानजनक किंवा मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावू शकतो.
विजयी धावांचा बचाव करताना प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज वरचढ ठरतात. गोलंदाजांना विकेट मिळणं अवघड होतं. तसेच गोलंदाज धावा रोखण्यात अपयशी ठरतात. अशात आव्हानात्मक स्थितीत कर्णधार फलंदाजाला बाहेर करुन गोलंदाजीत माहीर असलेल्या समावेश करतो.
दरम्यान आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 19 व्या मोसमात सर्व 10 संघांचे कर्णधार हे भारतीय आहेत. हे शक्य झालं ते सनरायजर्स हैदराबाद संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याच्यामुळे. पॅट गेल्या अनेक महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीसह 2 हात करत आहे. पॅटला या दुखापतीमुळे आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आयपीएलच्या 19 व्या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावं लागलं आहे. त्यामुळे सनरायजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन इशान किशन याला देण्यात आली आहेत. इशानची हंगामी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पॅटच्या कमबॅकपर्यंत इशानच सनरायजर्स हैदराबादच्या नेतृत्वाचा गाडा हाकणार आहे.