कात्रज - भारती विद्यापीठ परिसरातील एका हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे अचानक भडका उडाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत चार जण किरकोळ जखमी झाले असून हॉटेलचे किरकोळ नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे हॉटेल सकाळी व संध्याकाळी सुरू असते. सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास कामगारांनी हॉटेल उघडले असता गॅसचा तीव्र वास येत होता.
तसेच गॅस प्रेशरचा आवाजही ऐकू येत होता. परिस्थिती लक्षात घेऊन कामगारांनी तात्काळ लाईट बंद केली. मात्र काही क्षणांतच गॅसचा भडका उडून आग लागली. घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या आगीत हॉटेलमधील पीयुसी शीट कोसळली, खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि परिसरात एकच खळबळ उडाली. हॉटेलमध्ये व्यावसायिक वापरासाठीचे दोन १९ किलोचे गॅस सिलेंडर होते. घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कात्रज अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रदीप खेडेकर यांनी सांगितले की, गॅस गळतीमुळे भडका उडून ही घटना घडली असून चार कामगार हात पायाला भाजून किरकोळ जखमी झाले आहेत.
अग्निशमन जवान पोहचले त्यावेळी कोठेही आग लागलेली आढळली नाही. या वेळी उप अग्निशमन अधिकारी संतोष भिलारे तसेच फायरमन किरण पाटील, मयूर काटे, लियाकत मुजावर हे उपस्थित होते.