RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?
esakal March 29, 2026 12:45 AM

Heinrich Klaasen reaction to third umpire decision IPL 2026 : इंडियन प्रीमिअर लीग २०२६च्या पहिल्याच सामन्यात वादग्रस्त निकाल पाहायला मिळाल्याचा सनरायझर्स हैदराबादच्या फॅन्सचा आरोप होतोय... रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करून srh ला दडपणात ठेवले होते. पण, कर्णधार इशान किशन व हेनरिच क्लासन यांनी ९७ धावांची भागीदारी करून SRH चा डाव सावरला. पण, या भागीदारीचा शेवट वादग्रस्त ठरला.

जेकब डफीने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये २२ धावा देताना ३ विकेट्स घेऊन SRH चं कंबरडं मोडलं. अभिषेक शर्मा ( ७), ट्रॅव्हिस हेड ( ११ ) व नितीश कुमार रेड्डी ( १) यांना आखुड टप्प्याच्या चेंडूवर झेल देण्यास भाग पाडून RCBच्या गोलंदाजाने मैदान गाजवले. रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय डफीने सार्थ ठरवला. SRH ची आक्रमक फलंदाजांची ताकद आज पॉवर प्लेमध्ये दिसलीच नाही. डफीने चतुराईने त्यांना फक्त ३ बाद ४९ धावांवर रोखले.

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

भुवनेश्वर कुमार व डफी यांनी टिच्चून मारा करताना SRH च्या सलामी जोडीवर दडपण निर्माण केले आणि त्याचे यश त्यांना मिळाले. तिसऱ्या षटकात दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवल्यानंतर डफीने पुढील षटकात आणखी एक विकेट घेतली. ८ चेंडूंत ३ विकेट्स घेऊन त्याने मॅच फिरवली. एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील हा १०१ वा सामना आहे आणि सर्वाधिक आयपीएल सामने खेळणाऱ्या मैदानांमध्ये हा दुसरा क्रमांक आहे. वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक १२३ सामने खेळले गेले आहेत.

२७ वर्ष व २५३ दिवसांचा इशान किशन हा सनरायझर्स हैदराबादचा सर्वात युवा कर्णधार ठरला. त्याने आणि हेनरिच क्लासन यांनी SRH चा डाव सावरताना २८ चेंडूंत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. इशानने आयपीएलमध्ये ३००० धावांचा टप्पा ओलांडला आणि भारतीयांमध्ये सर्वात कमी चेंडूंत हा टप्पा गाठणारा तो सहावा फलंदाज ठरला. रिषभ पंत ( २०२८ चेंडू), युसूफ पठाण ( २०८२), सूर्यकुमार यादव ( २१३०), सुरेश रैना ( २१३५), महेंद्रसिंग धोनी ( २१५२) यांच्यानंतर इशानचा ( २१८०) क्रमांक येतो. इशानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा फॉर्म कायम राखला.

इशानने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून SRH च्या डावाला आता आकार देण्यास सुरूवात केली. इशान व हेनरिच यांनी हात मोकळे करताना धावांचा वेग वाढवला आणि हैदराबादला मोठ्या धावसंख्येच्या दिशेन वाटचाल करून दिली. रोमारिओ शेफर्डने ही जोडी तोडली. १४ व्या षटकात फिल सॉल्टने सीमारेषेच्या अगदी जवळ अप्रतिम झेल घेतला. हेनरिच २२ चेंडूंत ३१ धावांवर बाद झाला आणि इशानसह त्याची ९७ धावांची भागीदारी संपुष्टात आली. तिसऱ्या अम्पायरकडे हा निर्णय गेला आणि OUT निर्णय झाला. हेनरिच या निर्णयाने फार आनंदी नाही दिसला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.