रेमंडला जागतिक ओळख देणारे विजयपत सिंघानिया काळाच्या पडद्याआड, उद्योगविश्वातील दिग्गज हरपला
एबीपी माझा ब्युरो March 29, 2026 02:43 AM

मुंबई : देशातील नामांकित उद्योगपती, रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते विजयपत सिंघानिया (Vijaypat Singhania) यांचं वयाच्या 87 व्या वर्षी मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आणि रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी दिली. उद्योग, विमानचालन आणि सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या या दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने अनेकांनी दुःख व्यक्त केलं.

विजयपत सिंघानिया हे केवळ उद्योगपती नव्हते, तर ते एक कुशल एव्हिएटर म्हणूनही ओळखले जायचे. हॉट एअर बलूनद्वारे सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या या साहसी वृत्तीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले.

Raymond Legacy : छोट्या मिलपासून जागतिक ब्रँडपर्यंत प्रवास

रेमंड या वस्त्र ब्रँडला देश-विदेशात ओळख मिळवून देण्यात विजयपत सिंघानिया यांचा मोठा वाटा आहे. 1958 मध्ये मुंबईत पहिलं रेमंड शोरूम सुरू करण्यात आलं. 1960 मध्ये परदेशातून आधुनिक मशिनरी आयात करून त्यांनी उत्पादनाला नवी दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली रेमंडने जागतिक स्तरावर झेप घेतली.

Raymond Business Expansion : व्यवसायाचा विस्तार आणि नवे ब्रँड

1980 मध्ये कंपनीची सूत्रं विजयपत सिंघानिया हाती आल्यानंतर त्यांनी व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. 1986 मध्ये ‘पार्क अव्हेन्यू’ हा परफ्यूम ब्रँड लाँच करत त्यांनी फॅब्रिकच्या पलीकडे जाऊन विविध क्षेत्रांत प्रवेश केला. 1990 मध्ये परदेशात पहिलं शोरूम सुरू करून त्यांनी रेमंडचा विस्तार जागतिक पातळीवर नेला.

Raymond Leadership Transition : मुलाकडे सूत्रं सोपवली

सुमारे दोन दशकं कंपनीचं नेतृत्व केल्यानंतर विजयपत सिंघानिया यांनी कंपनीची जबाबदारी आपल्या मुलगा गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपवली. त्यांनी आपली 37 टक्के भागिदारीही मुलाच्या नावावर केली होती. पुढे काही काळ दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता, मात्र तो नंतर मिटला.

Vijaypat Singhania Final Rites : रविवारी अंत्यसंस्कार

विजयपत सिंघानिया यांच्यावर रविवारी, 29 मार्च रोजी मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने उद्योग क्षेत्रातील एक मोठं युग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.