दौंड - दौंड शहरात गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण करणाऱ्या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कत्तलीसाठी गायी नेल्या जात असल्याच्या संशयावरून ही मारहाण करण्यात आली होती.
दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. टेम्पोचालक शाहरूख नूर शेख (रा. लोहियानगर, स्वारगेट, पुणे) हा २७ मार्च रोजी दुपारी भरतगाव (ता. दौंड) येथून नऊ गाया घेऊन चापडगाव (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथे दौंड मार्गे निघाला होता. गायी विकत घेणारा एक जण व त्याचा मित्र देखील टेम्पोत होता. दरम्यान रात्री हा टेम्पो दौंड शहरातून अष्टविनायक मार्गाने न जाता वाट चुकल्याने शहरातील भाजी मंडईच्या दिशेने वळाला. तेथे पाच जणांनी टेम्पो अडविला.
टेम्पोतील गाया कत्तलीसाठी नेल्या जात असल्याच्या संशयावरून या तरूणांनी चालकाला दमदाटी केली. चालकाने गायी विकत घेऊन चापडगाव येथे सोडण्यासाठी जात असल्याचे सांगूनही तरूणांचे समाधान झाले नाही. त्यांच्यामधील वाद वाढून टेम्पोचालक व गायी विकत घेणाऱ्यांना दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. टोळक्याने खिशातील तेराशे रूपये काढून जीवे मारण्याची धमकी दिली, असे शाहरूख शेख याने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार दौंड पोलिस ठाण्यात रुद्राक्ष लवटे, सुरेश पालवे (दोघे रा. गोपाळवाडी, ता. दौंड), सोनू थोरात (रा. भाजी मंडई, दौंड), संकेत दळवी (रा. मोरे वस्ती, लिंगाळी, ता. दौंड) व एक अनोळखी तरूण, असे एकूण पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ११८ (घातक साधनांनी इच्छापूर्वक दुखापत करणे किंवा जबर दुखापत करणे), कलम ११९ - १ (मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी इच्छापूर्वक जबर दुखापत करणे), कलम १८९ - २ (बेकायदेशीर जमाव करणे), कलम १९१ - २ (दंगा करणे) अन्वये पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.