Plane Service : पुणे-बँकॉक विमानसेवा बंद; 'इंडिगो'चे उन्हाळी वेळापत्रक जाहीर
esakal March 29, 2026 02:45 AM

पुणे - पुणे विमानतळाच्या उन्हाळी हंगामात इंडिगोची पुणे-बँकॉक विमानसेवा प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे बंद केली, तर पुणे-पाटणा विमानाची वेळ बदलून आता रात्रीची केली आहे. याशिवाय उन्हाळी हंगामात नवीन फारसा बदल नाही.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगोच्या उन्हाळी वेळापत्रकाला मंजुरी दिली आहे. यात पुणे विमानतळाचाही समावेश आहे. संकेतस्थळावरील उपलब्ध वेळापत्रकानुसार, पुण्याहून यंदाच्या उन्हाळी हंगामात कोणतेही नवीन सेक्टर (शहराची सेवा) सुरू होणार नाही. हे जवळपास निश्चित आहे.

केवळ एखाद्या मार्गावर सेवा वाढवणे अथवा कमी करणे, तसेच विमानाच्या वेळेत बदल करणे एवढाच बदल असणार आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातून पुणेकरांच्या पदरी निराशाच पडणार आहे. विमानतळ प्रशासन नेहमीप्रमाणे हंगाम सुरू होण्याआधी अधिकृतपणे हंगाम जाहीर करण्याची शक्यता आहे.

बँकॉक सेवा जमिनीवरच

पुणे-बँकॉक विमानसेवेला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सततच्या कमी प्रतिसादामुळे सेवा चालवणे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नसल्याने कंपनीने पुणे विमानतळाच्या उन्हाळी हंगामात पुणे-बँकॉक सेवा रद्द केली. आता बँकॉकसाठी पुण्याहून केवळ ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ची सेवा सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला फटका

एकीकडे पुणे विमानतळावरून नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्याची सातत्याने मागणी होत आहे. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय सेवा वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अपुऱ्या प्रतिसादामुळे चालू असलेली बँकॉकची आंतरराष्ट्रीय सेवाही बंद पडणे, हा पुणे विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पुणे-पाटणाची वेळ

  • पुणे-पाटणा - रात्री ११.४० पुण्याहून उड्डाण, रात्री २.०० पाटण्यात दाखल

  • पाटणा-पुणे - रात्री २.५५ पाटण्यातून उड्डाण, पहाटे ५.१० पुण्यात दाखल

पुणे हे देशातील प्रमुख शहर आहे. पुण्याची क्षमता असतानाही आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा विस्तार न होणे चिंतेची बाब आहे. देशांतर्गत विमानसेवेत नवीन सेक्टर सुरू झाल्यास त्याचा फायदा पुणेकरांना होईल, मात्र तसे होताना दिसत नाही.

- मेहबूब शेख, अध्यक्ष, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.