गॅस हवा असेल तर संपर्क साधा; जैन समुदायाला पत्र, मंगलप्रभात लोढा वादाच्या भोवऱ्यात
Tv9 Marathi March 29, 2026 12:45 AM

घरगुती गॅस हवा असेल तर कार्यालयाशी संपर्क साधा, असं पत्र मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समुदायाला लिहिलं आहे. लोढा यांच्या या पत्रावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. लोढा यांच्याकडून फक्त जैन समुदायाच्या मदतीसाठी विशेष पत्र लिहिण्यात आलं आहे. या पत्रावरून आता महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे फक्त जैन समाजाचेच मंत्री आहेत का? अशी टीका   लोढा यांच्यावर होऊ लागली आहे. मुंबईत हजारो लोकांना गॅस टंचाईची झळ बसत आहे. जे व्यावसाय हे पूर्णपणे गॅसवर अवलंबून होते, ते बंद पडले आहेत. अशी परिस्थिती असताना देखील आता लोढा यांनी फक्त जैन संस्थांना भासणाऱ्या गॅसच्या तुटवड्यासंदर्भातच पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे. जैन समाजाचा आंबिल नावाचा सण जवळ आला आहे. त्या पार्श्वभूमीवर काही जैन संघटनांकडून गॅसच्या संकटाबद्दल मंत्री लोढा यांच्याकडे तक्रारी आल्या. त्यावर तात्काळ कृती दाखवत लोढा यांनी जैन संघाला एक पत्र लिहिलं.

लोढा यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?

‘आंबील सणावेळी गॅसची समस्या होवू शकते, अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. जर तुमच्या जैन मंदिरात गॅसची समस्या असेल, तर तुम्हाला किती मदत लागेल ते मला पत्राद्वारे कळवा. गरजुंनी पत्र पाठवल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असं आपल्या या पत्रात लोढा यांनी म्हटलं आहे.’ आता याच पत्रावरून लोढा यांच्यावर टीका होऊ लागली आहे. ‘आमच्या हिंदूंचा गुढीपाडवा झाला, आमच्या हिंदूंची रामनवमी झाली. आता येणारी हनुमान जंयती आहे. अजूनही अनेक सण आहेत. मग यासाठी लोढा यांनी काही पत्र दिलं आहे का? असा सवाल यावर उपस्थित करण्यात आला आहे.

लोढा यांच पत्रावर स्पष्टीकरण 

दरम्यान त्यावर आता लोढा यांचं आपल्या या पत्रावर स्पष्टीकरण देखील आलं आहे. ‘माझ्या मतदारसंघात कुणालाही धार्मिक कार्यास गॅस लागला तर मी तो उपलब्ध करून देईल. राजकीय हेतूनं माझ्यावर निरर्थक टीका होत आहे.’  असं लोढा यांनी म्हटलं आहे.

मनसे आक्रमक

दरम्यान लोढा यांच्या या पत्रानंतर आता मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेकडून मलबार हिल विधासभेतील सर्व गॅस वितरकांना एक पत्र देण्यात आलं आहे.   ‘आमदार मंगलप्रभात लोढा यांचे जैन समाजावर विशेष प्रेम असल्याकारणाने त्या समाजाला सुलभ गॅस सिलेंडर पुरवठा उपलब्ध व्हावा, या साठी विभागातील गॅस वितरकांवर दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे. जर असं काही घडत असेल तर मनसेशी संर्पक साधा, असं आव्हान या पत्रातून मनसेनं गॅस वितरकांना केलं आहे. तसेच  सामान्य लोकांना डावलून फक्त जैन समुदायावर विशेष प्रेम दाखवल्यास मनसे दणका दिला जाईल असा इशाराही गॅस वितरकांना मनसेकडून देण्यात आला आहे.

दरम्यान दुसरीकडे आम्ही गिरगावकर या सामाजिक संस्थेच्या वतीने देखील मंगल प्रभात लोढा यांच्या या भूमिकेचा विरोध करण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने एक व्यंगचित्र काढण्यात आलं आहे. तसेच  आम्ही लोढा यांच्या या भूमिकेला विरोध करत आहोत, लवकरच आम्ही या विरोधात आंदोलन करू असा इशाराही संस्थेचे अध्यक्ष वैभव सागवेकर यांनी दिला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.