RCB vs SRH: पहिल्या सामन्यात आरसीबीचा संघ काळी पट्टी बांधून उतरला, कारण की…
GH News March 29, 2026 01:12 AM

आयपीएल 2026 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गतविजेता आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमनेसामने आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा आरसीबीच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. विजयी सुरूवात करण्याच्या हेतूने दोन्ही संघ उतरले. पण मग्राउंड असल्याने आरसीबीने या सामन्यात विजयासाठी जोर लावला. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 201 धावा केल्या आणि विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं. आरसीबीने पॉवर प्लेमध्ये धुमधडका करून सामन्यावर पकड मिळवली. पण या सामन्यात एक गोष्ट क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेत होती. आरसीबी संघ हाताला काळी पट्टी बांधून उतरला होता. काळी पट्टी बांधण्याचं कारण अनेकांना कळलं नाही. पण मागच्या वर्षी चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पावलेल्या क्रीडाप्रेमींना ही श्रद्धांजली अर्पण केली गेली. या सामन्यापूर्वी पार पडलल्या वॉर्मअप सामन्यात दोन्ही संघांनी 11 क्रमांकाची जर्सी परिधान करून दिवंगत क्रीडाप्रेमींना श्रद्धांजली वाहिली होती.

आयपीएल 2025 स्पर्धेत आरसीबीने जेतेपदावर नाव कोरलं. 18 वर्षानंतर आरसीबीने हे यश संपादन केलं होतं. त्यामुळे चाहत्यांचा आनंदाला पारावर उरला नव्हता. या विजयानंतर आरसीबीचा संघ बंगळुरूत दाखल झाला. विजयी संघाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली होती. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि 11 लोकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर आरसीबी फ्रेंचायझीवर जोरदार टीका झाली. आता आरसीबीने मृतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी हाताला काळी पट्टी बांधून उतरले. या सामन्यापूर्वी 11 चाहत्यांना श्रद्धांजली दिली गेली. त्यांच्यासाठी एका मिनिटांचं मौनही ठेवलं गेलं. इतकंच काय तर बीसीसीआयने ओपनिंग सेरेमनीही रद्द केली.

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने या स्टेडियममध्ये एका स्मारकाचं अनावरण ही केलं आहे. त्यामुळे ही घटना कायम स्मरणात राहिल, अशा भावना आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये क्रिकेट सामन्या खेळण्यास बंदी घातली गेली होती. सुरक्षेच्या कारणास्तव महिला वनडे वर्ल्डकप, केएससीए महाराजा ट्रॉफी इतरत्र खेळवल्या गेल्या. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचे सामनेही खेळवले नाहीत. पण आता सुरक्षेच्या अडचणी दूर केल्याने या मैदानात सामने खेळण्यास परवानगी मिळाली आहे. या स्टेडियममध्ये 33 हजार प्रेक्षक सामना पाहू शकतात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.