Iran Israel America War : अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने (IRGC) अमेरिकेचे आणखी एक एफ-16 लढाऊ विमान पाडल्याचे म्हटले आहे. यापूर्वी, इराणने एफ-35 आणि एफ-15 लढाऊ विमानांना लक्ष्य केल्याचा दावा केला होता. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) हे दावे फेटाळून लावले आहेत.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) रविवारी (22 मार्च, 2026 ) एक निवेदन जारी करून दावा केला आहे की, त्यांनी आपल्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालीचा वापर करून होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर अमेरिकेचे एक एफ-15 लढाऊ विमान पाडले आहे. इराणच्या 'फार्स न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या एफ-15 लढाऊ विमानाला इराणी हवाई संरक्षण दलाच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीने लक्ष्य केले होते.
यापूर्वी, इराणने अमेरिकेचे सर्वात प्रगत आणि प्राणघातक एफ-35 लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला होता. इराणच्या सरकारी माध्यम वाहिनीने म्हटले होते की, इराणने युद्धात अमेरिकेचे एक एफ-35 विमान यशस्वीरित्या पाडले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी गुरुवारी (19 मार्च, 2026) सांगितले की, आपत्कालीन लँडिंगनंतर अमेरिकेच्या एफ-35 स्टेल्थ लढाऊ विमानाचा पायलट स्थिर स्थितीत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, मात्र त्यांनी आपत्कालीन लँडिंगचे कारण स्पष्ट केले नाही. दुसरीकडे, इराणने अमेरिकेचे लढाऊ विमान यशस्वीरित्या पाडल्याची घोषणा केली.
28 फेब्रुवारी 2026 पासून मध्य-पूर्वेत इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात, अमेरिकेची अनेक लढाऊ विमाने आणि इतर विमाने नष्ट झाली आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून, इराणने एफ-15 एफ-16 आणि एफ-35 सह अमेरिकेची अनेक प्रगत स्टेल्थ लढाऊ विमाने, तसेच एक थाड (THAAD) रडार प्रणाली पाडल्याचा दावा केला आहे. आकडेवारीनुसार, या युद्धात दोन डझनांहून अधिक अमेरिकन विमाने पाडण्यात आली आहेत किंवा त्यांचे नुकसान झाले आहे, आणि यापैकी किमान 17 विमाने पाडल्याचा दावा इराणने केला आहे.