कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत 284 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. या यादीत काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते राहिलेल्या अधीर रंजन चौधरींच्या नावाचा समावेश आहे. अधीर रंजन चौधरी पश्चिम बंगालच्या बहरामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर
काँग्रेसनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं पहिल्या यादीत 284 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
काँग्रेस उमेदवारांच्या यादीत मौसम नूर यांचं नाव आहे. मौसम नूर या काँग्रेसच्या राज्यसभा खासदार होत्या. त्यांचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसनं मौसम नूर यांच्या विश्वास दर्शवला आहे. मौसम नूर या पश्चिम बंगालच्या मालतीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील.
ममता बॅनर्जी, सुवेंदू अधिकारींविरोधात उमेदवार
काँग्रेस पक्षानं पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून प्रदी प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. भवानीपूर मतदारसंघातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप नेते सुवेंदू अधिकारी निवडणूक लढवत आहेत. सुवेंदू अधिकारी भवानीपूर आणि नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. यावेळी भवानीपूरमध्ये तिरंगी लढत होणार असल्यानं निवडणूक लक्षवेधी बनली आहे.
नंदीग्राममध्ये काँग्रेसनं एस के जरियातूल हुसैन यांना उमेदवारी दिली आहे. इथं सुवेंदू अधिकारी भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणूक
भारतीय निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालच्या 294 जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक 23 एप्रिल 2026 ला होणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक 29 एप्रिल 2026 ला होणार आहे. मतमोजणी आणि निकाल 4 मे रोजी जाहीर होईल.
आणखी वाचा