सुहास राजदेरकर, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
इराण -इस्राईल युद्धामुळे आधीच बहुतेकांची गुंतवणूक तोट्यात आलेली असताना, आधी विकलेले शेअर किंवा इक्विटी म्युच्युअल फंडांवर भांडवली करसुद्धा द्यावा लागला, तर जास्तच वाईट वाटेल, नाही का? पण काळजी करण्याचे कारण नाही, कारण यावर एक उत्तम उपाय आहे तो म्हणजे ‘टॅक्स हार्वेस्टिंग’चा!
‘टॅक्स हार्वेस्टिंग’ म्हणजे काय?
‘टॅक्स हार्वेस्टिंग’ हे कायदेशीर आहे. हार्वेस्ट म्हणजे कापणे किंवा तोडणे. ‘टॅक्स हार्वेस्टिंग’ म्हणजे भांडवली कर कमी किंवा शून्य करणे. एका मालमत्ता विभागाचा भांडवली लाभ त्याच किंवा दुसऱ्या मालमत्ता विभागामधील तोट्याबरोबर जुळवून (सेट ऑफ) झालेला लाभ कमी करणे. भांडवली लाभ कमी झाला, की अर्थातच करही कमी होणार. एखाद्या वर्षात तुम्हाला भांडवली लाभ झालेला नसेल तरीही, या वर्षीचा भांडवली तोटा, पुढील वर्षातील भांडवली नफ्याबरोबर ‘सेट ऑफ’ करता येतो. भांडवली तोटा तुम्हाला पुढील आठ वर्षांपर्यंत केव्हाही वापरता येतो. यामध्ये दीर्घकालीन भांडवली लाभ किंवा तोटा आणि अल्पकालीन भांडवली लाभ किंवा तोटा असे दोन प्रकार असतात. अल्पकालीन भांडवली तोटा हा आधीच्या अल्पकालीन किंवा दीर्घकालीन अशा दोन्ही भांडवली नफ्याबरोबर ‘सेट ऑफ’ करता येतो. मात्र, दीर्घकालीन भांडवली तोटा हा फक्त दीर्घ भांडवली लाभाबरोबर ‘सेट ऑफ’ होतो. खरेदी केलेल्या दिवसापासून १२ महिन्यांच्या आत विक्री केली, तर झालेल्या नफा अथवा तोट्याला अल्पकालीन लाभ किंवा तोटा म्हणतात आणि १२ महिन्यांच्या नंतर विक्री केली, तर त्याला दीर्घकालीन भांडवली लाभ किंवा तोटा म्हणतात. अल्पकालीन भांडवली लाभावरील कर आहे २० टक्के, तर दीर्घकालीन भांडवली लाभावरील कर आहे १२.५० टक्के. तसेच एका आर्थिक वर्षासाठी, १,२५,००० पर्यंतचा, दीर्घकालीन भांडवली लाभ करमुक्त असतो. त्यापुढील लाभावर कर द्यावा लागतो.
एक उदाहरण
सोहम, शेअर आणि म्युच्युअल फंड योजनांमध्ये जमेल तशी गुंतवणूक करतो. मागील तीन वर्षांमध्ये त्याला कधीही तोटा झाला नाही. परंतु, यावर्षी इराण-इस्राईल युद्धामुळे, शेअरमध्ये तोटा दिसत आहे. सोहमने एप्रिल २०२५ मध्ये लार्सन अँड टुब्रो कंपनीचे ४००० रुपयांना एक प्रमाणे १०० शेअर, चार लाख रुपयांना विकत घेतले. फेब्रुवारी २०२६ मध्ये शेअरचा भाव ४२०० रुपये गेल्यामुळे त्याने ५० शेअर विकले. मिळालेल्या २,१०,००० रुपयांमध्ये नफा झाला १०,००० रुपये. आता त्याला अल्पकालीन भांडवली लाभावरील कर भरावा लागेल, जो २० टक्के आहे म्हणजेच २,००० रुपये. परंतु, आता बाजार घसरला आहे आणि एका शेअरचा भाव आहे ३५०० रुपये. सोहमला उरलेले ५० शेअर ठेवायचे आहेत. परंतु, ही एक भांडवली कर कमी करण्याची म्हणजेच ‘टॅक्स हार्वेस्टिंग’ची संधीही आहे.
असा घ्या फायदा!
सोहमने त्याच्याकडे उरलेले ५० शेअर ३५०० रुपयांना विकायचे आणि लगेच परत त्याच भावाला खरेदी करायचे. प्राप्तिकर नियमांनुसार, आधी खरेदी केलेला भाव आधी विकलेल्या शेअरशी जुळविली जाते. यालाच ‘फिफो’ अर्थात ‘फर्स्ट इन फर्स्ट आउट’ असे म्हणतात. अर्थात, विकलेल्या ५० शेअरवर सोहमला तोटा झाला २५,००० रुपये. (४००० - ३५०० = ५०० गुणिले ५०). हा २५,००० रुपयांचा अल्पकालीन भांडवली तोटा तो आधी झालेल्या १०,००० रुपयांच्या भांडवली लाभातून वजा करू शकतो. म्हणजे नफा झाला (-) १५,००० रुपये आणि भांडवली लाभावरील कर झाला शून्य रुपये, जो आधी होता २,००० रुपये. अर्थात २,००० रुपये भांडवली लाभावरील कर वाचवूनदेखील त्याचे ५० शेअर त्याच्याकडेच आहेत.
तुम्ही अशा स्थितीतून जात असाल, तर सीए किंवा तज्ज्ञ सल्लागारांच्या मदतीने ‘टॅक्स हार्वेस्टिंग’चा उपाय वापरायला हरकत नाही. त्यासाठी आजच शेवटची संधी आहे.