देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 7 दशकं झाली, मात्र 78 वर्षांनीही देशातील काही गावांत वीजेचा मागमूस नव्हता. नैनीताल विधानसभा क्षेत्रातील गोरिया देव गावच्या टोक ग्वाल देव येथेही अशीच काहीशी परिस्थिती होती. मात्र आता जवळपास 78 वर्षांनी वीज आल्याने हे गाव प्रकाशमान झाल्याने, गावकरी आनंदित झाले आहेत. वीजेसारख्या मूलभूत सुविधांपासून दीर्घकाळापासून वंचित असलेल्या गावकऱ्यांसाठी (वीज येणं) हे एका स्वप्नपूर्तीसारखं आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री राकेश नैनवाल यांच्या प्रयत्नांमुळे हे काम शक्य झाले. त्यांनी खासदार अजय भट्ट यांच्या खासदार निधीतून गावाला वीजपुरवठा मिळवून देण्याचं काम केलं.
अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही, वीज विभागाच्या पथकाने उंच डोंगरांमधून अडीच किलोमीटरची वीज वाहिनी टाकली आणि भूपाल सिंग नेगी, गोविंद सिंग नेगी व राम सिंग नेगी यांच्या घरांपर्यंत वीज पोहोचवली. गावात वीज पोहोचल्यानंतर मी गावाला स्वतः भेट देईन, असा संकल्प केला होता, अखेर आता हे काम पूर्ण झालं, असं राकेश नैनवाल यांनी नमूद केलं. हे काम सरकारच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. त्यांनी नैनितालचे खासदार अजय भट्ट यांचा विशेष उल्लेख केला, या दुर्गम भागात वीजपुरवठा खासदार विकास निधीमुळे (MPLADS) शक्य झाला असंही त्यांनी सांगितलं.
कित्येक वर्षांनी वीज आल्याने गावातील सर्व कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यादरम्यान राकेश नैनवाल यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिलं की, गावापर्यंत लवकरच रस्त्याची जोडणी देखील करून दिली जाईल. खासदारांशी चर्चा करून रस्ता बांधणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असं ते म्हणाले.
माजी प्रमुख राजू नेगी यांनी या प्रसंगी विशेष सहकार्य केले. सरपंच बालम नेगी, किसान मोर्चा कार्यकर्ते ललित नेगी, ज्येष्ठ नेते हरीश बेलवाल, माजी मंडी उपाध्यक्ष मन सिंग रावत, वीज विभागाचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी दीपक पाठक, चंदन जलाल आणि इतर अनेक ग्रामस्थही उपस्थित होते.