Mira Bhayandar Crime News : बिझनेस लोन पुरवठा करणाऱ्या ठाण्यातील 40 वर्षीय व्यक्तीला जाळ्यात अडवून मारहाण करत खंडणी वसूल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मिरा-भाईंदरमधील मिरा रोड परिसरात घडली आहे. लोन घेण्याच्या बहाण्याने जाळ्यात ओढून मारहाण करत खंडणी उकळली आहे. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून तीन फरार आरोपींचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती बिझनेस लोन प्रोव्हाइड करण्याचे काम करत असून, त्याची ओळख ‘टींडर’ अॅपद्वारे एका महिलेशी झाली होती. महिलेने स्वतःला बिझनेस लोनची गरज असल्याचे सांगत संबंधित व्यक्तीला मिरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात बोलावले आणि डॉक्युमेंट्स घेण्यासाठी भेटण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचल्यावर महिलेने त्याला एका घरात नेले. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या तीन पुरुषांनी त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी मारहाण करत दीड लाख रुपयांची मागणी केली व धमकी देत त्याच्याकडून 45 हजार रुपये उकळून घेतले आणि पसार झाले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित महिलेचा शोध घेत तिला अटक केली आहे. तिच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 309, 127, 102, 115(2), 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कटात सहभागी असलेल्या इतर तीन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असून त्यांचा लवकरच माग काढण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.