सद्गुरू, ईशा फाउंडेशन
सद्गुरू : हजारो वर्षांच्या सभ्यतेनंतर, हजारो वर्षे इतर अनेक प्राण्यांच्या प्रजातींची आणि कधी कधी आपल्याच वंशाची कत्तल केल्यानंतरदेखील, मानवी कल्याण अजूनही दूर आहे. सर्व प्रकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण बाह्य परिस्थितीमध्ये इतके बदल केले आहेत, तरीही आपण दहा हजार वर्षांपूर्वीच्या तुलनेत मानवी कल्याणाच्या जवळपाससुद्धा पोहोचलेलो नाही. त्यामुळे, निश्चितच आता आपण अंतर्मुख होऊन मानवी कल्याण कसे निर्माण करायचे, हे पाहण्याची वेळ आली आहे. तुमच्या स्वतःच्या जीवनाच्या अनुभवातून तुम्ही हे स्पष्टपणे पाहू शकता, की खरे कल्याण तुम्हाला तेव्हाच प्राप्त होईल, जेव्हा तुमच्या आंतरिकतेमध्ये बदल होईल.
सध्या तुमच्या जीवनाची गुणवत्ता तुम्ही घालता त्या कपड्यांवर, तुमच्या शैक्षणिक पात्रतेवर, तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर किंवा तुमच्या बँक खात्यातील रकमेवर ठरत नाही. या क्षणी, तुमच्या जीवनाची गुणवत्ता ही केवळ तुम्ही आतून किती शांत आणि आनंदी आहात, यावर ठरते. योग आणि ध्यान हा विज्ञानाचा असा पैलू आहे, जो तुमच्या आंतरिक स्थितीची काळजी घेतो, जिथे योग्य प्रकारची आंतरिक अवस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते, जेणेकरून तुम्ही आनंदी आणि शांततापूर्ण जीवन जगू शकाल. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तुम्ही फक्त चांगले जीवन जगू शकाल.
हे योग विज्ञान आता पूर्वीपेक्षाही अधिक महत्त्वाचे झाले आहे. मी असे म्हणत नाही, की ते आधी महत्त्वाचे नव्हते. मी असे म्हणत आहे कारण, आज जगात गोष्टी करण्यासाठी आपल्या हातात प्रचंड साधने आहेत. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने, आपण इच्छा केल्यास पर्वतदेखील नाहीसे करू शकतो. जेव्हा आपल्या हातात इतकी शक्ती असते, तेव्हा आपल्या आतमध्ये एक आंतरिक जाणीव, जीवनाबद्दल जागरूकता असणे खूप महत्त्वाचे ठरते. आपण जीवनाला आणि प्रत्येक सजीवाला स्वतःचाच एक भाग म्हणून अनुभवणे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा, आपण स्वतःसाठी एक मोठे संकट निर्माण करू शकतो, आणि अनेक प्रकारे आपण सध्या तेच करत आहोत. आपण असे संकट निर्माण करत आहोत, की जगात फक्त श्वास घेणे हीदेखील एक समस्या बनत आहे. या जगात फक्त अस्तित्वात राहणे हीदेखील एक समस्या बनत आहे. हे केवळ यामुळे घडले आहे, कारण आपण केवळ बाह्य विज्ञानाकडे लक्ष दिले आहे. स्वतःच्या आतमध्ये योग्य प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याच्या आंतरिक विज्ञानाकडे आपण कधीच पाहिले नाही.
त्यामुळे निश्चितच योगविज्ञान पूर्वीपेक्षा अधिक समर्पक आहे, कारण आज तुम्ही शक्तिशाली आहात. जेव्हा तुम्ही शक्तिशाली असता, तेव्हा तुम्ही समजूतदार असणे खूप महत्त्वाचे असते. विज्ञानाने आणलेल्या सोयी आणि सुविधांमुळे मानवाचे खरे कल्याण तेव्हाच होऊ शकते, जेव्हा तुमच्या आंतरिक स्थितीचीही योग्य प्रकारे काळजी घेतली जाते.