पुणे : नाशिकमधील भोंदू अशोक खरातचा (Ashok Kharat) सीए प्रकाश पोफळे (Prakash Pophale) यांनी २०२४ मध्ये पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात आठ रो हाऊससेस, ४९ गुंठे जागेसह खरेदी केली. कागदोपत्री याची किंमत १९ कोटी ५६ लाख रुपये दाखवण्यात आली आहे. मात्र कोरेगाव पार्क हा परिसर पुण्यातील सर्वात महागड्या भागांपैकी एक असून, लेन नंबर तीनमध्ये अनेक बड्या उद्योगपतींची बंगल्यांची मालमत्ता आहे. या पार्श्वभूमीवर या खरेदीची खरी किंमत शंभर कोटींपेक्षा अधिक असल्याचे बोलले जात आहे. अशोक खरातच्या (Ashok Kharat) सीएकडे इतके पैसे कुठून आले?, खरात सीएमार्फत काळा पैसा पांढरा करत होता का?, अशोक खरातचा या व्यवहाराशी संबंध आहे का? आणि एसआयटीकडून चौकशी होणार आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. दरम्यान याचसंदर्भात एबीपी माझाने खरातच्या (Ashok Kharat) सीएशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही.
खरातचा (Ashok Kharat) सीए असलेल्या पोफळेची पुण्यातील अत्यंत महागड्या समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क भागात मोठी संपत्ती असल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या नावावर तब्बल १८ रो-हाऊस असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. नाशिक आणि आसपासच्या परिसरात सुमारे ४९ गुंठे मोकळी जागा/जमीन असल्याची माहिती समोर आली आहे. सीए पोफळे हा खरातच्या सर्व काळ्या पैशांचे आणि गुंतवणुकीचे नियोजन करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. 'शिवनिका' ट्रस्ट आणि इतर व्यवहारांमधून जमा झालेला पैसा या मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व मालमत्तांची खरेदी कधी झाली, त्यासाठी पैसे कुठून आले आणि यामध्ये बेनामी व्यवहार झाले आहेत का, याचा तपास आता विशेष तपास पथक (SIT) करत आहे.
तर अशोक खरातच्या सीएची पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरात १९ कोटींची संपत्ती आहे. ती संपत्ती घेण्यासाठी अशोक खरातच्या सीएकडे इतके पैसे कुठून आले? असा सवालही उपस्थित होतो आहे. अशोक खरात सीएमार्फत काळा पैसा पांढरा करत होता का? अशोक खरातचा या व्यवहाराशी संबंध आहे का? खरातचा सीए प्रकाश पोफळेच्या नावे कागदोपत्री १९ कोटींची संपत्ती आहे मात्र जागेची खरी किंमत शंभर कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.
मंत्रतंत्राच्या नावाखाली विकृत आणि भोंदू अशोक खरातनं सामान्यांपासून उद्योजकांचे फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. खरातनं गारूड कसं घातलं, याचं वर्णन करणारं एका उद्योजकाचं पुस्तकच एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. भोंदू खरातचे तत्कालीन भक्त असलेले सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी असा मी नामकर्ण हे आत्मचरित्र लिहिलंय. त्यात त्यांनी खरातला अद्भुत आणि चमत्कारिक पुरुषाचा दर्जा दिला आहे. २०१२मध्ये लिहिलेल्या या पुस्तकात नामकर्ण यांनी खरातवर तब्बल १३ पानं खर्ची घातली आहेत. त्यातून खरातबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.