आरोग्य'चेतना : मानेच्या मज्जारज्जूवरचा दाब
esakal March 31, 2026 09:45 AM

डॉ. जयदेव पंचवाघ, मेंदू आणि स्पाईन सर्जन

मणका आणि मज्जारजूच्या आजारामध्ये एक असं वैशिष्ट्य आहे, की लक्षणाचं निदान कधी-कधी उशिरा होतं. ‘आजार एका ठिकाणी आणि लक्षणे दुसऱ्याच ठिकाणी’. सर्वच मज्जासंस्थेच्या (Nervous System) बाबतीत तर हे सूत्र खरं आहे. प्रत्यक्ष मेंदूला किंवा मज्जारज्जूला वेदनेची स्वतःची संवेदना नसते. म्हणजेच, शस्त्रक्रिया करताना या महत्त्वाच्या अवयवांना छेद दिला, तर तिथे वेदना होत नाहीत. मात्र, या अवयवांवर आलेला थोडासाही दाब शरीराच्या दूरवरच्या भागात मोठी उलथापालथ घडवून आणतो.

उदाहरणार्थ, कंबरेच्या मणक्यात नसांवर दाब आला, की ‘पावलांमधील’ ताकद कमी होते. मेंदूच्या उजव्या भागात इजा झाली, की शरीराच्या डाव्या बाजूला अर्धांगवायूचा झटका बसतो. म्हणजेच आजार एका ठिकाणी; पण लक्षणं खूपच दूरवर ही तफावतच अनेकदा निदानाला विलंब लावते. रुग्ण विचार करतो, की ‘माझी मान तर दुखत नाहीये, मग माझ्या हाताची बोटं का काम करत नाहीत याचं कारण मानेत कसं असेल?’ याच गोंधळातून मग चुकीच्या दिशेनं प्रवास होतो.

माझ्याकडे ‘वसंत’ नावाचा एक पेशंट आला, तेव्हा त्याची लक्षणं वाढत चालली होती. त्याला दोन्ही हातांच्या बोटांत कमकुवतपणा जाणवत होता. कधीतरी मुंग्या यायच्या. विशेष म्हणजे, त्याला मानदुखीचा फारसा त्रास नव्हता. चालताना कधीतरी तोल गेल्यासारखा वाटायचा; पण तो तुलनेनं कमी होता. ही लक्षणं हळूहळू वाढत होती; पण ती एखाद्या गंभीर आजाराची नांदी आहेत, हे त्याच्या लक्षात आलं नव्हतं.

मी तपासलं, तेव्हा त्याच्या मानेतल्या मज्जारज्जूचा आजार असल्याची लक्षणं होती. त्याला दोन बोटांच्या चिमटीत कागद धरता येत नव्हता. शर्टाचं बटण लावणं कठीण जात होतं. वैद्यकीय भाषेत याला ‘स्मॉल मसल वीकनेस’ म्हणतात. याचं उगमस्थान बहुतांशी मानेच्या मज्जारज्जूमध्ये असतं.

वसंतला डोळे बंद करून उभं राहण्यास सांगितलं, तेव्हा तो पडायला लागला. मानेच्या मज्जारज्जूवर दाब असतो, तेव्हा पायांकडून मेंदूकडे जाणाऱ्या संवेदनांचा प्रवाह खंडित होतो. डोळे उघडे असेपर्यंत माणूस जमिनीकडे बघून आपला तोल सावरतो. मात्र, डोळे बंद होताच किंवा अंधारात चालताना, मेंदूला पायांच्या स्थितीची माहिती मिळणं बंद होतं आणि तोल जातो.

वसंतच्या मणक्याचा एमआरआय करणं गरजेचं होतं. काही कारणांनी वसंतनं तातडीनं निर्णय घेतला नाही. ‘एमआरआय, शस्त्रक्रिया कशाला हवी? व्यायाम करा, ठीक होईल,’ इत्यादी ‘समजूतदार’ सल्ले. अशा परिस्थितीत जे व्यायाम करणं चुकीचं ठरतं नेमके तेच व्यायाम त्यानं सहा महिनं नेटानं केलं. मान जोरात वाकवणं, गोल गोल फिरवणं, कान खांद्याला लावणं वगैरे! हातापायातली लक्षणं कमी होण्याऐवजी वाढत गेली.

सहा महिन्यांनंतर तो परत आला, तेव्हा त्याच्या एमआरआयमध्ये धक्कादायक स्थिती होती. वसंतला आधाराशिवाय चालता येत नव्हतं. त्याच्या मज्जारज्जूवर दाब (‘पिन्सर कॉम्प्रेशन’) वाढला होता. म्हणजे मज्जारज्जू दोन हाडांच्या मध्ये चेंगटला गेला होता. अशा स्थितीत मानेचे व्यायाम करणं म्हणजे मज्जारज्जूला अधिक इजा करणं होय. त्याच्या मज्जारज्जूच्या आतल्या भागात जखम झाली होती, ज्याला आम्ही ‘इंट्रा मेड्युलरी हायपरइंटेन्सिटी’ म्हणतो.

मज्जारज्जूमध्ये एक विलक्षण गुणधर्म असतो, ज्याला ‘सहनशीलता’ (Resilience) म्हणतात. तो बराच काळ दाब सोसून आपलं कार्य चालू ठेवतो. जेव्हा रुग्ण म्हणतो, की ‘आता मला त्रास व्हायला लागला आहे,’ तेव्हा ती रोगाची सुरुवात नसून पुढचा टप्पा असतो. मज्जारज्जूतील पेशी एकदा का नष्ट झाल्या, की त्या पुन्हा तयार होत नाहीत.

वसंतची शस्त्रक्रिया ACDF (Anterior Cervical Discectomy and Fusion) पद्धतीनं केली गेली. शस्त्रक्रियेनंतर तो ८५ टक्के सुधारला; पण तो शंभर टक्के बरा होऊ शकला नाही. कारण ती सहा महिन्यांची दिरंगाई आणि चुकीचा व्यायाम यांमुळे मज्जारज्जूच्या काही पेशींची कायमची हानी झाली होती.

निष्कर्ष

‘सर्व्हायकल स्पाँडिलोटिक मायलोपथी’ (CSM) हा आजार हळूहळू स्पायनल कॉर्डला इजा करत जातो. याचा अर्थ मणक्याच्या प्रत्येक आजारात शस्त्रक्रिया लागते असा होत नाही; पण व्यवस्थित तपासून ऑपरेशनची गरज असेल तर तसं स्पष्ट सांगणं आणि अमलात आणणं अत्यंत गरजेचं आहे.

आजकाल व्यायामाने मणक्याचे आजार कसे बरे होऊ शकतात हे उत्साहाने सांगितलं जातं; पण काही आजारात व्यायामांनी हानी होऊ शकते हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

रुग्णांनी हे समजून घेतलं पाहिजे, की ‘आपल्याला जे ऐकायला आवडतं’ तो सल्ला योग्य असेलच असं नाही. विज्ञानाचा आधार घेऊन, वेळेत घेतलेला निर्णय हा अपंगत्वापासून वाचवणारा ठरतो. मज्जारज्जूचं मौन हे त्याचं आरोग्य नव्हे, तर ती त्यानं केलेली सहनशीलता असू शकते. त्याच्या काही लक्षणांकडे व्यवस्थित लक्ष ठेवा!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.