अकोला: शहराच्या विकासाचा रोडमॅप ठरणाऱ्या महानगरपालिकेच्या विशेष अर्थसंकल्पीय सभेत सोमवारी (ता.३०) अभूतपूर्व गोंधळ उडाला. अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर शहरातील विकासकामांवर चर्चा अपेक्षित असताना ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ या घोषणांनी सभागृह पेटले. त्यानंतर १६ विरोधी नगरसेवकांचे निलंबनाचे आदेश निघाले. मनपा प्रशासनाला पोलिस बंदोबस्त बोलाविण्याची वेळ आली व निलंबित नगरसेवकांना सभागृहाबाहेर पडावे लागले.
पोलिसांना केले पाचारणविरोधी नगरसेवकांनी सभागृह सोडण्यास नकार दिल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली. अखेर महापौरांनी पोलिसांना पाचारण करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. पोलिसांच्या उपस्थितीत विरोधी पक्षातील नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळेच परिस्थिती नियंत्रणात आली.
Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आगसुमारे १,५०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर अपेक्षित चर्चा न होता सभेला राजकारणाचा रंग चढल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महानगरपालिकेची विशेष अर्थसंकल्पीय सभा महापौर शारदा खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीला स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक महापौरांकडे सुपूर्द केले.
ही सभा अत्यंत महत्वाची असल्याने सभागृहात शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, आरोग्य सुविधा, झोपडपट्टी विकास, कर संकलन, अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा अपेक्षित होती.
मात्र, सभागृहातील वातावरण काही वेळातच तापले. अंदाजपत्रकावर चर्चा सुरू होताच वंचित बहुजन आघाडीचे स्वीकृत नगरसेवक सुनील इन्नानी बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर बोलण्यास सुरुवात करण्याआधीच सत्ताधारी शहर सुधार आघाडीच्या काही नगरसेवकांकडून ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ अशा घोषणा देण्यात आल्या.
या घोषणेमुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. विरोधी पक्षातील नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेत गदारोळ सुरू केला. घोषणाबाजीमुळे सभागृहातील वातावरण चिघळले आणि काही वेळ सभागृहात आरडाओरडा सुरू राहिला.
Premium|Summer Travel Tips : उन्हाळ्यातला ‘कूल’ प्रवास; 'योग्य कपडे, पाणी, सनस्क्रीन आणि प्रथमोपचार कीटसह सुरक्षित सफरीचे सोपे नियमया घोषणांवर विरोधी पक्ष आक्रमक झाला. विरोधी पक्षनेते डॉ. झीशान हुसेन, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निलेश देव, पराग गवई, काँग्रेसचे आझाद खान, फजलू पेहलवान, उबाठाचे शंकर लंघोटे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी घोषणांवर तीव्र आक्षेप घेतला.
नगरसेवक सुनील इन्नानी यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या नगरसेवकांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी केली.
मात्र, सत्ताधारी बाजूनेही यावर आक्रमक पवित्रा घेण्यात आल्याने वातावरण आणखी तापले. सभेला महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती.
विकासावर चर्चाचझालीच नाहीसुमारे १,५०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर चर्चा अपेक्षित असताना संपूर्ण सभेत विकासाच्या मुद्द्यांवर फारशी चर्चा झाली नाही. महत्त्वाचे मुद्दे चर्चेविना राहिल्याचे दिसून आले. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, पाणीटंचाईचा प्रश्न, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता यंत्रणा, आरोग्य सुविधा, पथदिवे व मूलभूत सुविधा आदी विषयांवर चर्चा न होता केवळ राजकारण झाल्याचे दिसून आले.
असा पेटला वादवंचितचे नगरसेवक सुनील इन्नानी आपली भूमिका मांडण्यासाठी समोर येताच सत्ताधारी काही नगरसेवकांनी ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर वंचितचे पराग गवई यांनी आक्रमक होत इन्नानी यांची बाजू घेतली. तसेच विरोधी नगरसेवकांनी आक्रमक होत ठिय्या दिला व सत्ताधाऱ्यांना माफी मागण्यासाठी आग्रह धरला. सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यावर ‘होय, आमची हुकूमशाही आहे’, असे प्रत्युत्तर स्थायी सभापती विजय अग्रवाल यांनी दिले. यानंतर वाद आणखीच पेटला.
या नगरसेवकांचे झाले निलंबननिलंबन झालेल्या नगरसेवकांमध्ये आझादखान अलीयार खान, मो.फजलू, पराग गवई, निलेश देव, शेख शमशु, डॉ.झीशान हुसेन, विजय इंगळे, शंकर लंघोटे, निलोफर खान सोहेल खान, आकाश कवडे, अभय खुमकर, जैनब बी शेख इब्राहीम, आर्शीया परवीन, उज्वला पातोडे, सुवर्णरेखा जाधव, जयश्री बहादुरकर यांचा समावेश आहे.
"शहराच्या विकास कामांवर सूचना सुचविण्यासाठी संधी असताना विरोधकांनी केवळ राजकारण केले. अर्थसंकल्पीय सभेत झालेला वाद थांबविण्यासाठी वारंवार सांगण्यात आले. मात्र, शांतता न ठेवता विरोधकांनी राजकारण केले. चुकीच्या कोणत्याही गोष्टीचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र, सभागृहाची शिस्त भंग केल्याने १६ नगरसेवकांचे पुढील तीन सभांसाठी निलंबन करण्यात आले."
-शारदा रणजीत खेडकर, महापौर, मनपा, अकोला
"बजेटमध्ये जनतेसाठी तरतूद कशारितीने जास्तीत जास्त होईल, याचा आग्रह विरोधी गटातील नगरसेवकांनी धरला होता. अर्थसंकल्पावरील अनेक चुकीच्या बाबींवर आम्ही बोट ठेवले होते. वंचितचे सुनील इन्नानी उभे राहताच घोषणाबाजी केली. त्याला आम्ही संविधानिक पद्धतीने विरोध केला. मात्र, सत्ताधाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले व १६ नगरसेवकांचे निलंबन केले. आम्ही आमच्या पद्धतीने सभागृह चालवू अशी सत्ताधाऱ्यांची मुजोरी आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना सभागृहात प्रवेश नाकारण्यालाही आम्ही विरोध केला. यापुढेही आम्ही भ्रष्ट कारभारावर बोलत राहू."
-डॉ.झीशान हुसेन, विरोधी पक्षनेता, मनपा अकोला
विरोधी नगरसेवकांचा ठिय्यामाफी न मागितल्याने विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन सुरू केले. सभागृहातच ठिय्या देत त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. सभागृहात काही काळ कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. महापौरांनी वारंवार शांतता राखण्याचे आवाहन केले; मात्र विरोधकांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. गोंधळ वाढत असल्याने अखेर महापौर शारदा खेडकर यांनी विरोधी पक्षातील १४ नगरसेवकांना पुढील तीन सभांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश दिला. या निर्णयामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले. त्यांनी निलंबनाचा निषेध करत घोषणाबाजी सुरूच ठेवली. काही नगरसेवकांनी हा निर्णय लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप केला.
पत्रकारांचा ठिय्या; मागणीला यशसभागृहातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे पत्रकारांनी नाराजी व्यक्त करत ठिय्या दिला. वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना सभागृहात बसू दिले नसल्याने पत्रकारांनी शांततेच्या मार्गाने महापौरांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. पत्रकारांना वृत्तांकनासाठी बसण्याची परवानगी द्यावी, पत्रकारांवर निर्बंध लावणे चुकीचे आहे अशी भूमिका यावेळी पत्रकारांनी घेतली. सभेनंतर पत्रकारांशी महापौर शारदा खेडकर तसेच स्थायी सभापती विजय अग्रवाल यांनी चर्चा केली. पत्रकारांच्यावतीने एका प्रतिनिधीला पुढील सभेपासून कॅमेऱ्यासह सभागृहात प्रवेश देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. या निर्णयावर पत्रकारांनी समाधान व्यक्त करीत ठिय्या आंदोलन मागे घेतले.