Pimpri Chinchwad Water Crisis: पिंपरी-चिंचवडला भामा आसखेडचे पाणी अद्यापही दुरापास्त; भूसंपादन, ठेकेदार बदल आणि प्रशासनाच्या निर्णयांवर टीका
esakal March 31, 2026 09:45 AM

पिंपरी : भामा आसखेड धरणातून दररोज १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी मिळणार असल्याचे गेल्या पाच वर्षांपासून सांगितले जात आहे. मात्र, रखडलेले भूसंपादन, शेतकऱ्यांचा विरोध, मुदतवाढ देऊनही ठेकेदाराकडून होणारा विलंब, काम काढून घेतल्यानंतरही त्याच ठेकेदाराकडून काम करून घेण्याच्या हालचाली, यामुळे प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. पिंपरी चिंचवडसाठी आवश्यक असलेले भामा आसखेडचे पाणी मात्र, विलंबाच्या गटांगळ्या खात आहे.

पिंपरी चिंचवड शहराला सध्या पवना आणि आंद्रा धरणातून पाणी मिळत आहे. मात्र, भामा आसखेडचे काम पाच वर्षांपासून सुरूच आहे. मुदतवाढ देऊनही काम पूर्ण न झाल्याने ठेकेदाराकडून काम काढून घेण्याचा आदेश तत्कालीन प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गेल्या महिन्यात दिला होता. नवीन ठेकेदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी प्रशासनाने केली. मात्र, नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लोकप्रतिनिधींसमवेत गेल्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. संबंधित ठेकेदाराच्या अडचणी समजून घेतल्या. नवीन ठेकेदार नियुक्तीनंतर कामास होणारा विलंब विचारात घेतला. त्यामुळे जुन्या ठेकेदाराकडून काम करून घ्यायचे की नवीन ठेकेदार नियुक्त करायचा? असा पेच प्रशासनासमोर होता. नवीन प्रक्रियेमुळे किमान वर्षभरापेक्षा अधिक वेळ लागणार आहे.

तुलनेत सध्याच्या ठेकेदाराकडून काम लवकर पूर्ण होऊ शकेल, या शक्यतेने कामातील अडचणी सोडवण्यासह अटी व शर्तींच्या अधीन राहून काम करण्यास तयार असल्यास पूर्वीच्याच ठेकेदाराकडून जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

भामा आसखेड जॅकवेल आणि जलवाहिनीच्या कामाची पाहणी केली आहे. नवीन निविदा प्रक्रिया केल्यास एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. त्यामुळे आहे त्याच ठेकेदाराकडून अटी व शर्तींच्या अधीन राहून काम करण्याचे विचाराधीन आहे.

- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.