स्वयंपाकघर स्वच्छ असले तरी अनेकदा मुंग्या, झुरळं आणि ओट्यावरील किड्यांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. यामुळे अन्नाची नासाडी तर होतेच, पण आरोग्यालाही धोका निर्माण होतो.
यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे धोक्याचे ठरू शकते. मग अशावेळी नेमकं काय करावं, हे सुचत नाही. अशा वेळी आपल्या घरातील नैसर्गिक घटकांचा वापर करून या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.
झुरळांना तमालपत्राचा उग्र वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्ही तमालपत्राचा चुरा करून किचनच्या कोपऱ्यात किंवा जिथे झुरळांचा वावर जास्त आहे तिथे टाकावा. या वासामुळे झुरळं पळून जातात.
किचन ओटा पुसल्यानंतरही त्यावर बारीक किडे फिरत असतील तर ते टाळण्यासाठी कापूर वापरावा. ओटा पुसण्याच्या पाण्यात थोडे कापूर विरघळून त्या पाण्याने ओटा पुसावा. यामुळे ओटा स्वच्छ राहतो आणि त्यावर किडे येत नाहीत.
किचन सिंकमधून अनेकदा झुरळं बाहेर येतात किंवा तिथे घाण वास येतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी सिंकच्या जाळीत १-२ लवंग टाकून ठेवाव्यात. यामुळे दुर्गंधी येत नाही आणि किडेही कमी होतात.
साखरेच्या डब्यात मुंग्या जाणे ही गृहिणींची मोठी समस्या असते. त्यामुळे साखरेच्या किंवा गुळाच्या डब्याला मुंग्या लागू नयेत म्हणून डब्याच्या बाहेरून थोडे तेल लावावे. तेलाच्या चिकटपणामुळे आणि वासामुळे मुंग्या डब्यावर चढत नाहीत.