Satara News : साताऱ्यातील सिव्हिल रुग्णालयातील हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. मृत्यूनंतरही माणसाला सन्मान मिळत नाही, अशी संतापजनक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील 51 वर्षीय सुरेश खोमणे या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. पण त्यानंतर जे घडलं, ते अक्षरशः अंगावर शहारे आणणारं आहे. रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात दिले. मात्र कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची थेट अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची थेट अदलाबदल झाली आहे. इतकंच नव्हे, तर एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही उरकले. चिता पेटल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मग पेटती चिता विझवण्याची वेळ नातेवाईकांवर आली. या घटनेमुळे कुटुंबीयांचा संताप अनावर झाला असून, रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोंधळ निर्माण झाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, मृत्यूनंतरही माणसाला सन्मान मिळणार नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.