सध्या राज्यात प्रसिद्ध भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच गाजत आहे. दररोज या प्रकरणी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आता अशोक खरातच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. त्याच्या शिर्डी जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात तपास यंत्रणांनी महत्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह एकूण पाच जणांवर फसवणूक आणि सावकारकी (मनी लेंडिंग) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना अटक करण्यात आली. राहाता न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुख्य आरोपी अशोक खरात आधीच तुरुंगात
या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याला आधीच अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आता त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर आरोपी अशोक तांबे यांना लवकरच अटक करण्याची तयारी केली आहे. या फसवणुकीत शिर्डी परिसरातील जमिनींच्या खरेदी-विक्रीत मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुन्ह्यात सामील असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असून, तपास अधिकाधिक वेगाने सुरू आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावे देखील लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याने तपासात महत्वाची माहिती समोर येण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) सध्या या सर्व पैलूंचा सखोल तपास करत आहे. सूत्रांच्या मते, SIT च्या तपासात आणखी काही गंभीर आणि धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे आणि गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अशोक खरातला 1 एप्रिल पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. आणखी काही माहिती समोर येते का हे पाहण्यासाठी सर्व आतुर आहेत.