Pimpri Chinchwad Rahatani civic school crisis: रहाटणीतील २.४० हेक्टर आरक्षित जागा ३० वर्षांपासून रिकामीच; मोडकळीस आलेल्या इमारतीत व पत्राशेडमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण
esakal April 01, 2026 07:45 AM

पिंपरी ः रहाटणी परिसरात प्राथमिक शाळेसाठी विकास आराखड्यातील आरक्षित जागा मागील ३० वर्षांपासून महापालिकेच्या ताब्यात आहे. तरीही, अद्याप आरक्षित जागेवर शाळा बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे मोडकळीस आलेली इमारत आणि पत्राशेडमध्ये विद्यार्थ्यांना शिकावे लागत आहे.

महापालिका विकास आराखड्यानुसार रहाटणी प्रभागात क्र.६४६ सर्व्हे क्र.५३ व ६.९.पै. आरक्षण क्र. ६५२ सर्व्हे क्र. २९ व ३७ पै. तसेच आरक्षण क्र. ६५५ सर्व्हे क्र. ४४ भूखंड प्राथमिक शाळेसाठी आरक्षित आहे. महापालिका शाळांसाठी नवीन इमारती बांधत आहेत. तसेच बरेच ठिकाणी नूतनीकरण आणि दुरुस्ती देखील सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी महापालिकेच्या सीबीएसई नवीन इंग्रजी शाळा सुरू होत आहेत. परंतु रहाटणी प्रभागामध्ये मागील ३०-३५ वर्षांपासून आरक्षित जागा असताना देखील एकही शाळा महापालिकेने सुरू केलेली नाही. रहाटणीमध्ये एकूण २.४० हेक्टर जागेवर मनपा प्राथमिक शाळेचे आरक्षण आहे. यापैकी मागील ३० वर्षांपासून एकच मनपा शाळा रहाटणी गावठाण येथे आहे. रहाटणी परिसरातील विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात ती अपुरी आहे. तसेच या प्रभागात एकही माध्यमिक शाळा नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना रहाटणी फाटा, श्रीनगर, तापकीर मळा तसेच आसपासच्या परिसरातून पुढील शिक्षणासाठी पायपीट करावी लागत आहे.

इमारत ३० वर्षे जुनी

शाळेची इमारत ही जवळपास ३० वर्षे जुनी आहे. रहाटणी शाळा क्र.५५ चे जुने बांधकाम असून मोडकळीस आले आहे. त्या इमारतीवर स्ट्रक्चरल ऑडिटनुसार नवे बांधकाम होऊ शकत नाही. जवळपास २,५०० विद्यार्थी शिकत असून विद्यार्थ्यांसाठी इमारत अपुरी पडत असल्याने शाळेच्या छतावर चक्क पत्राच्या खोल्यांमध्ये विद्यार्थी बसत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेच्या आरक्षित जागेवर तातडीने नवीन इमारत बांधून जुन्या ठिकाणी शाळेचे मैदान तयार करण्यात यावे, अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.

रहाटणीतील जुन्या शाळेच्या जवळ आरक्षित जागा आहे. जुन्या शाळेच्या इमारतीची परिस्थिती पाहता तसेच विद्यार्थी संख्या जास्त असल्याने नवीन शाळा बांधण्यात यावी.

- दयानंद यादव, शिक्षक

रहाटणी प्राथमिक शाळेसाठी विकास आराखड्यात जागा आरक्षित आहे. पण, त्यासंदर्भात माझ्याकडे कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही.

- किशोर ननावरे, क्षेत्रीय अधिकारी, ‘ग’ कार्यालय महापालिका

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.