प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : शालेय शिष्यवृत्ती परीक्षांचे महत्त्व
esakal April 01, 2026 08:45 AM

जयवंत बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

शालेय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षांची माहिती मिळाली, परंतु विद्यार्थ्यांनी या परीक्षा का द्यायच्या, हे समजून घेणे आवश्यक आहे. या परीक्षा देण्याच्या इयत्तेपर्यंतचा अभ्यासक्रम हा संबंधित परीक्षेचा असतो. त्यामुळे विषयातील घटक-उपघटकांचा सूक्ष्म, सखोल व विविधांगी अभ्यास होतो. तसेच विद्यार्थ्यांची समजाची किंवा आकलनाची पातळी वाढते.

अभ्यासात प्रावीण्य

नियमित अभ्यासाशिवाय काही जास्तीचा अभ्यासक्रम असतो. त्यामुळे अभ्यास अधिक पक्का होतो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात व संबंधित विषयात प्रावीण्य प्राप्त होते. तसेच या परीक्षांच्या माध्यमातून विविध अभ्यासकौशल्ये विकसित होतात.

आत्मविश्वासात वाढ

आव्हानात्मक प्रश्नांचा सराव केल्याने सर्वसाधारण ते हुशार विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचीच प्रगती होते. या परीक्षांत ‘ज्ञानाचे उपयोजन’ यावर आधारित प्रश्नप्रकार असतात. त्यामुळे आतापर्यंत मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त चांगल्या किंवा परिणामकारक पद्धतीने केल्याने, आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

कौशल्यातून व्यक्तिमत्त्व विकास

या परीक्षांच्या अनुषंगाने विविधांगी विचार करावा लागतो. त्यामुळे विचारांना नेमकी दिशा मिळते. त्यातून तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागते. वेगवेगळ्या परिस्थितीचा व घटनांचा विचार करून, निर्णय घ्यावा लागतो. समस्येची सोडवणूक केल्यामुळे, कार्यकारण संबंध लक्षात येतो व अनुमान काढण्याची क्षमता वाढते. तसेच नियोजनबद्ध अभ्यास व सराव यातून वेळेचे प्रभावी व्यवस्थापन करण्याची क्षमता विकसित होते.

ग्रंथालयाचा वापर व मार्गदर्शन

ग्रंथालयातून संदर्भ पुस्तके आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध होऊ शकतात. काही मार्गदर्शक पुस्तके विकत घेऊन नेमका अभ्यास करता येतो. वेगवेगळ्या दहा मार्गदर्शक पुस्तकांचा एक-एक वेळा अभ्यास करण्यापेक्षा, नेमक्या आणि एखाद्या पुस्तकाचा दहा वेळा अभ्यास करणे देखील श्रेयस्कर ठरु शकते. यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. त्यांचा योग्य पद्धतीने शोध घेतल्यास, ते सहज उपलब्ध होऊ शकतात.

यशाची पंचसूत्री

जिद्द, चिकाटी, कष्ट, सातत्य आणि सराव ही पंचसूत्री अवलंबली की हमखास यश प्राप्त होते. तरीदेखील अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यातून यशाचे माप एखाद्यावेळी पदरी पडले नाही, तरी नाराज होणे योग्य नाही. त्यातून जे-जे शिकायला मिळते, ते वाया न जाता भविष्यात कुठे ना कुठेतरी यश मिळविण्यास सहाय्यभूत ठरते.

उज्ज्वल भविष्याची पायाभरणी

शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांना सामोरे जातांना एका विशिष्ट पद्धतीने अभ्यास केला जातो. त्यामुळे वेळेचा अधिकाधिक सदुपयोग होतो. त्याशिवाय बालवयात अभ्यास करण्याची आवड निर्माण होते. विशिष्ट प्रकारे अभ्यास करण्याची बैठक तयार होते. गुणवत्ता वाढीबरोबरच भावी जीवनात द्याव्या लागणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची भक्कम पायाभरणी होते.

गुणवत्ता विकासाचा निकष

या परीक्षेतील यश म्हणजेच गुणवत्ता विकासाचे अचूक मोजमाप करण्याचा निकष मानला जातो. यातून होणारे बाह्य मूल्यमापन, हा त्या सर्व बाबींचा मापदंड मानला जातो.

प्रज्ञावंतांची योग्य टप्प्यावर ओळख

अफाट बौद्धिक क्षमता लाभलेल्या विद्यार्थ्यांची ओळखही योग्य वेळी आणि टप्प्यावर होते. या परीक्षा त्यांच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरविण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यांच्या अध्ययनासाठी पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण केले जाते. तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या प्रज्ञाविकासासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

अशा प्रकारे सर्वांगाने विचार केला, तर स्पर्धा परीक्षांचे महत्त्व वादातीत आहे. त्या परीक्षांसाठी नेमकी कशी तयारी करावी? तयारी करताना कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत? या आणि यासारख्या अनेक बाबींचा विचार आपण पुढे करणार आहोत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.