डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
सोशल फोबियाबाबत मागील भागात आपण माहिती घेतली. तो उद्भवल्यानंतर काही काळजी घेतली तर भीती घालवू शकतो. सोशल फोबिया (भीती) पुढील प्रसंगात जाणवू शकतो.
१. अधिकारी किंवा सन्माननीय व्यक्तींशी बोलताना
२. विद्यार्थ्यांच्या बाबतीत, वर्गात उठून काही बोलायच्या वेळी
३. नवीन व्यक्तींना भेटताना
४. ऑफिसमध्ये सादरीकरण करताना
५. सभेत किंवा मीटिंगमध्ये बोलताना
६. कार्यक्रमात सहभागी होताना
७. सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरताना
८. सार्वजनिक ठिकाणी जेवताना
भीतीमधील भावनात्मक लक्षणे
दैनंदिन जीवनात सततची अस्वस्थता
ठरलेल्या कार्यक्रमाआधी किंवा घटनेआधी कित्येक दिवस भिती वाटायला सुरवात होणे
आपल्याकडे कुणीतरी सारखे बघतय, लक्ष ठेवून आहे
आपण चुकीचेच वागू असे वाटत राहणे
चेहरा मलूल दिसणे
श्वासोत्त्छ्वास जोरात होणे
पोटात खड्डा पडणे
वागणुकीतील बदल
समारंभांना किंवा गर्दी होणार असेल अशा ठिकाणी जाणे टाळणे.
कार्यक्रमांना गेल्यास कुणी बघणार नाही अशा जागी थांबण्याचा प्रयत्न करणे किंवा लवकरात लवकर कुणाच्याही नकळत निघून जाण्याचा प्रयत्न करणे.
सार्वजनिक ठिकाणी बोलायच्या टिप्स
लोकांच्या असण्याकडे लक्ष न देता आपल्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करावे.
शारीरिक ठेवण, आपण दिसतो कसे हे काही मिनिटं समोरच्यांना दिसते. त्यानंतर लक्षात राहते आपल्यातील आत्मविश्वास आणि सकारात्मकता.
शक्य असेल तर बोलण्याच्या प्रसंगापूर्वी थोडा शारीरिक व्यायाम होईल अशा पद्धतीच्या हालचाली कराव्या ज्यायोगे रक्ताभिसरण आणि प्राणवायूचा भरपूर पुरवठा होईल. त्यानंतर त्यानंतर काही दीर्घ श्वास घ्यावे आणि तोंडाने सोडावेत. त्यानंतर काही मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करून शांत बसावं.
जे बोलायचं आहे, ते मुद्देसूद असावं. म्हणजे काय बोलायचं हे मनात पक्का करावे.
रोज बोलण्याचा सराव करावा. एखादा विषय घ्यावा. मुद्दे निश्चित करावेत आणि एकटे असताना मोठ्यानं आरशात बघून, समोर लोकं आहेत असं कल्पून सराव करावा. त्यात कदाचित लोकांकडून विचारले जाणारे अपेक्षित प्रश्न आणि त्याची उत्तरं अंतर्भूत असावी.
आपलं बोलणं स्वच्छ असेल, आपण योग्य ठिकाणी पॉझेस घेत आहोत याकडे लक्ष ठेवावं. यासाठी तज्ज्ञांकडे प्रशिक्षण घ्यावं.
सरावा दरम्यान व इतर वेळी सकारात्मक स्वयं-सूचना देत रहाव्यात.
कल्पनेद्वारे चित्र उभे करण्याचे तंत्र शिकून घ्यावं
चांगल्या वक्त्यांची भाषणं ऐकावीत. त्यातील चांगल्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. पण नक्कल करू नये. आपण आपण असतो हे लक्षात ठेवावं
यासगळ्या गोष्टीनी एक प्रकारे सकारात्मकता निर्माण होते. चांगलं बोलता येणं हा सरावाचा भाग असू शकतो. अनेक चांगल्या वक्त्यांना सुरवातीला अडचणी आल्या होत्या हे लक्षात घ्यावं. निर्धार करावा आणि पुढे जावं.
सातत्यपूर्ण प्रयत्नांनी स्वतःमध्ये आमुलाग्र बदल होतो. दैनंदिन मिटिंग्स, कस्टमर मीटपासून सादरीकरणापर्यंत सगळ्याच गोष्टी विलक्षण आत्मविश्वासाने करता येतात. यासाठी आवश्यक वाटल्यास योग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे जास्त श्रेयस्कर ठरते.