करिअर वेध : प्रामाणिकपणा, नैतिकता व जीवनमूल्ये
esakal April 01, 2026 10:45 AM

विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

प्रामाणिकपणा हा गुण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचा आणि आवश्यक आहे. प्रथम स्वतःशी प्रामाणिक राहणे आणि अर्थातच बाहेरच्या जगाशी, समाजाशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे आहे. माणसाच्या आयुष्यात प्रामाणिकपणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व यावर अवलंबून असते. एक व्यक्ती म्हणून आयुष्यभर प्रामाणिकपणाचा चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो.

कॉर्पोरेट जगतात काम करताना एका विद्वानाने प्रामाणिकपणाची सोपी व्याख्या सांगितली होती, ‘जे सांगता तेच करा आणि जे करता तेच सांगा.’ जगाने तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल तर, तुमचा प्रामाणिकपणा उच्चस्तरीय पाहिजे. कदाचित आयुष्यात खऱ्या अर्थाने मोठे नाव कमवायचे असल्यास प्रामाणिकपणाशिवाय पर्याय नाही.

विशेषतः आर्थिक व्यवहारात, कागदपत्र तसेच कोणत्याही देवाण घेवाण प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाचे काय असेल तर प्रामाणिकपणा. पालकांनी प्रामाणिकपणाचे धडे पाल्याला अगदी लहान वयापासून देणे गरजेचे आहे. लहान वयात या विषयी झालेले संस्कार तुम्हाला आयुष्यभर उपयोगी ठरतील यात शंका नाही.

कॉर्पोरेट जगात प्रामाणिकपणाला महत्त्व आहे. तुम्ही भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करत असल्यास तुम्हाला अनेक प्रकारच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या व नियमांच्या चौकटीत राहून काम करावे लागते. उदा. कोणत्याही स्टेक होल्डर (ग्राहक, पुरवठादार, सरकारी यंत्रणा)बरोबर आर्थिक व्यवहार कंपनीच्या परवानगी शिवाय करता येत नाही. त्याचप्रमाणे पुरवठादार, ग्राहकाला भेट देणे आणि घेणे या विषयी खूप कडक नियम असतात त्याचे प्रामाणिकपणे पालन करणे यावर तुमचे उत्तम करिअर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते.

नैतिकता

कॉर्पोरेट जगात नैतिकतेला महत्त्व दिले जाते. तुम्ही घेणारे निर्णय हे कायम कंपनीच्या फायद्याचे असले पाहिजेत. कंपनीमध्ये सरकारी नियमांचे पालन करून रिपोर्ट्स सादर करावे लागतात. त्यासाठी माहिती खरी व योग्य देणे बंधनकारक असते. इथे तुमच्या नैतिकतेची खरी परीक्षा होते. आपल्या दैनंदिन जीवनात नैतिकतेची अनेक उदाहरणे आपल्याला रोज अनुभवास येतात. आपल्या आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर नैतिकतेचे महत्त्व अधोरेखित आहे. आपले व्यक्तिमत्त्व चांगले ठेवायचे असल्यास नैतिकतेच्या मार्गाने जाण्याशिवाय पर्याय नाही.

जीवनमूल्ये

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात, आपण आयुष्य कसे जगणार आहोत याची तत्त्वे वाढीच्या वयात मनावर कोरली जातात. जीवनात प्रत्येक जण त्याच वाटेवर आयुष्याचा प्रवास करतो, काहींना योग्य वयात योग्य दिशा मिळते तर काहींचे आयुष्य तसेच पुढे सरकते. कॉर्पोरेट जगतात असेच घडते, काही कंपन्या जीवनमुल्यांशी पूर्ण जुळून घेणाऱ्या असतात. आपल्या सामाजिक जीवनात जीवनमुल्यांना फार महत्त्व आहे. जीवनमूल्य सर्वाधिक प्राधान्य देणाऱ्या व्यक्तीच मोठ्या काळासाठी यश टिकवू शकतात.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रामाणिकपणा, नैतिकता आणि जीवनमूल्य या तीन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांच्या वाढत्या वयात याची जाणीव, पालक, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती, नातेवाईक, आजूबाजूचा समाज आणि मित्र मंडळी यांनी करून देणे महत्त्वाचे आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.