Writer Santosh Kumar Claims Aditya Dhar Copied Script: आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar 2 Box Office Collection) ऐतिहासिक कमाई करतोय. या सिनेमानं कमाईच्या बाबतीत कित्येक दिग्गजांना लोळवलं आहे. पण, आता दिग्दर्शक आदित्य धर (Director Aditya Dhar) आणि 'धुरंधर 2' अडचणीत सापडणार की काय? अशा चर्चांना उधाण आलंय. एका प्रसिद्ध लेखकानं आदित्य धरवर स्क्रिप्ट चोरल्याचा गंभीर आरोप लावलाय. प्रसिद्ध लेखक आणि फिल्ममेकरचं म्हणणं आहे की, रणवीर सिंहची ब्लॉकबस्टर फिल्म 'धुरंधर : द रिवेंज' (Dhurandhar The Revenge) याचं त्यांनी 2023 मध्ये लिहिलेल्या ओरिजिनल स्क्रिप्टशी खूपच साधर्म्य आहे.
संतोष कुमार आर.एस. (Writer Santosh Kumar) यांनी आदित्य धरवर 'धुरंधर 2' हा सिनेमा बनवण्यासाठी आपली स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप केलाय. संतोष कुमार आर.एस. यांनी माध्यमांसमोरच हा दावा केल्यानं खळबळ माजली आहे. संतोष कुमार यांनी असंही म्हटलंय की, ही स्क्रिप्ट केवळ एन्टरटेन्मेंटसाठी तयार करण्यात आलेली. पण ती चोरुन तिचा वापर राजकीय प्रोपोगंडा राबवण्यासाठी करण्यात आलाय. आदित्य रॉय कपूरला घेऊन सिनेमा बनवण्याचा त्यांचा मानस होता, पण, आदित्य धरनं त्यांची पटकथा चोरली आणि त्याऐवजी 'धुरंधर 2' फिल्मची निर्मिती केली. यासोबतच त्यांनी आता लवकरच कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती दिली. तसेच, त्यावेळी ते सर्व पुरावे सादर करणार असल्याचंही सांगितलंय.
संतोष कुमार आर.एस. यांनी सांगितलं की, स्क्रिप्ट लिहिल्यानंतर त्यांनी ती सोनी, झी, टी-सीरीज आणि धर्मा प्रोडक्शन्ससारख्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसकडे पाठवली होती. त्यावेळी त्यांनी मुख्य भूमिकेसाठी आदित्य रॉय कपूर यांची निवड केली होती. ही स्क्रिप्ट त्यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये स्क्रीनरायटर्स असोसिएशनमध्ये नोंदवली होती. त्यांच्याकडे ईमेल, कम्युनिकेशन, स्केचेस आणि पूर्ण स्क्रिप्टचे दस्तावेज उपलब्ध असल्याचा आहेत.
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2' सिनेमात रणवीर सिंहनं हमजा अली मजारी आणि जसकीरत सिंह रंगी या भूमिका साकारल्या आहेत. तर, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी आणि गौरव गेरा यांसारखी दमदार स्टारकास्ट झळकली आहे. हा सिनेमा 26/11 हल्ले आणि नोटबंदी यांसारख्या वास्तववादी घटनांपासून प्रेरित असल्याचं सांगितलं जातंय. पाकिस्तानमधील लियारी भागात एका भारतीय गुप्तहेराच्या एंट्री आणि त्याच्या मिशनभोवती ही कथा फिरते.
संतोष कुमार आर.एस. यांनी साऊथच्या लेखकांवर अन्याय होत असल्याची खंतही बोलून दाखवली आहे. 'धुरंधर 2' रिलीज झाल्यानंतर त्यांनी तो पाहिला, त्यावेळी त्यांना त्यांच्या कथेची झलक त्यात स्पष्टपणे दिसली. दक्षिण भारतातून येणाऱ्या लेखकांचं शोषण थांबवण्यासाठी हा मुद्दा पुढे आणल्याचंही त्यांनी बोलताना नमूद केलंय. दरम्यान, या आरोपांवर अद्याप आदित्य धर किंवा चित्रपट निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.